हैद्राबाद काँग्रेसची औपचारिक स्थापना १९४६ साली झाली. १९४६ पर्यंत निजाम सरकारने राज्यात काँग्रेसच्या स्थापनेस बंदी घातली होती. १९३८ साली राज्यात काँग्रेसची स्थापना करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो अयशस्वी झाल्याने महाराष्ट्र परिषद, आंध्र सभा आणि कर्नाटक परिषद अशा तीन संस्था अस्तित्वात आल्या. राष्ट्रीय काँग्रेस या तीन संस्थांमार्फत राजकीय चळवळी राबवत होती.
विनायकरावांनी प्रथम महाराष्ट्र परिषद आणि त्यानंतर १९४६ मध्ये हैद्राबाद काँग्रेसचे सभासदत्व घेतले होते. काँग्रेसच्या चळवळीत विनायकरावांचा सक्रिय सहभाग होता. राजकीय चळवळीतील काँग्रेसची परिणामकारकता आणि त्याचे महत्व विनायकरावांना पुरेपूर माहीत होते. परंतु विनायकरावांचे अंतर्मन कायम आर्यसमाजाबरोबर निगडित होते. विनायकरावांसाठी आर्यसमाज हा आत्मा होता आणि काँग्रेस हे शरीर होते.
इतिहास
भारतीय राजकारणात १९२० पासून महात्मा गांधींचे नेतृत्व उदयास आले. हैद्राबाद संस्थानावर वंशाने मुसलमान असलेला निजाम राजा राज्य करत होता. निजामाविरुद्ध जनतेचा लढा हिंदू - मुसलमान लढ्याचे स्वरूप घेईल ही चिंता काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना होती. १९२७ सालापर्यंत हैद्राबाद संस्थानात लक्ष घालू नये या मताचे गांधीजी होते.
बदलत्या परिस्थितीचा विचार करून १९३७ च्या सुमारास गांधीजी या निर्णयापर्यंत पोहोचले की हैद्राबादमध्ये जनतेचे आंदोलन सुरू झाले पाहिजे आणि काँग्रेसने त्याचे नेतृत्व करावे. राष्ट्रीय नेतृत्वाने हैद्राबादच्या पुढार्यांना सल्ला दिला,
“आता राजकीय संघटनेची वेळ आली आहे. तुम्ही हैद्राबाद स्टेट काँग्रेस स्थापन करा. परवानगी मिळाली नाही तर कायदेभंग करून, सत्याग्रह करून काँग्रेस स्थापन करावी लागेल.”
निजाम काँग्रेस स्थापनेला सहज परवानगी देईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. सत्याग्रहाचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्याबाहेर मनमाड येथे सभा बोलवण्यात आली. त्यात हैद्राबाद स्टेट काँग्रेस स्थापन करण्याचे ठरले. लागल्यास सत्याग्रह पुकारण्याचाही निर्णय घेण्यात आला. गोविंदराव नानल यांच्याकडे सत्याग्रहाचे नेतृत्व सुपूर्द करण्यात आले.
हैद्राबादमध्ये काँग्रेसची औपचारिक स्थापना करण्याचा दिवस ठरला. त्याच्या आदल्याच दिवशीच निजाम सरकारने आदेश काढून संस्थानामध्ये काँग्रेसची स्थापना करण्यास बंदी घातली. मनाई हुकूम मोडून हैद्राबाद काँग्रेसची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे काँग्रेसने सत्याग्रह पुकारला. सत्याग्रहाचे नेते या नात्याने गोविंदराव नानल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सत्याग्रहाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या हाती आले. परंतु काही दिवसांनी गांधीजींच्या आदेशाने सत्याग्रह थांबवण्यात आला. गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे समाजात अजून पुरेशी जागृती नाही तेव्हा सध्या व्यर्थ सत्याग्रह करणे उचित नाही. काँग्रेसच्या स्थापनेला परवानगी मिळावी यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद सरकारशी पत्रव्यवहार आणि वाटाघाटी केल्या. परंतु निजाम सरकारने काँग्रेसच्या स्थापनेला परवानगी दिली नाही. याला उपाय म्हणून महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक अशा तीन परिषदा निर्माण करण्यात आल्या.
अखेर जुलै १९४६ मध्ये निजामाने हैद्राबाद काँग्रेसवरची बंदी उठवली. ही बंदी उठताच महाराष्ट्र आंध्र आणि कर्नाटक सभा एकत्र आल्या. एकत्रितरित्या हैद्राबाद काँग्रेस स्थापन करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ हैद्राबाद काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
सहकारी
विनायकरावांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नात सक्रिय भाग घेतला. हैद्राबाद काँग्रेसच्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून विनायकराव स्वातंत्र्यासाठी लढले. श्री. काशिनाथ वैद्य, स्वामी रामानंद तीर्थ, श्री. बी. रामकृष्ण राव, श्री दिगंबर बिंदू, श्री मेलकोटे, श्री. गोविंदभाई श्रॉफ, इत्यादी काँग्रेसच्या नेत्यांशी विनायकरावांचे सलोख्याचे संबंध होते. विनायकरावांचे महाराष्ट्र परिषदेतील मराठी नेत्यांशी जेवढे सलोख्याचे संबंध होते तितकेच चांगले ते आंध्र सभा आणि कर्नाटक परिषद यांच्या नेत्यांशी होते.
रझाकार संघटना
कासिम रझवी यांनी १९४७ मध्ये हैदराबाद राज्यात ‘रझाकार संघटने’ची स्थापना केली त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मुस्लिमांनी धर्मयुद्ध म्हणून प्राणांची आहुती देण्याची पवित्र शपथ घेतली. रझवी यांच्याकडे सामान्य जनतेला प्रभावित करण्याचे आणि लढ्याची साहित्य सामग्री जमा करण्याचे उत्कृष्ट कौशल्य होते. त्यांनी उघडपणे जाहीर केले की मुसलमान हे हैद्राबादचे राज्यकर्ते आहेत आणि राज्य प्रशासनाच्या कारभारात हिंदूंचा कोणताही सहभाग नसेल. रझाकारांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. केवळ रझाकार धार्जिण्या सुन्नी मुसलमानांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचे सर्व अधिकारदेखील रझाकारधार्जिण्या अधिकाऱ्यांकडे आले. गुप्तचर विभाग, पोलीस इत्यादी शासकीय विभाग रिझवीच्या तालावर नाचणारे बाहुले बनले. मिळालेल्या निरंकुश सत्तेने उन्मत्त होऊन कासीम रिझवी आणि त्याची संघटना; रझाकार यांनी हिंदू जनतेवर अमानुष अत्याचाराचे सत्र अवलंबले.
१९४७ आणि १९४८ मध्ये हैद्राबाद काँग्रेस, आर्य समाज, हिंदू महासभा इत्यादी संघटनांचे प्रमुख ध्येय रझाकारांच्या अत्याचाराचा प्रतिकार करणे आणि बहुसंख्य हिंदू जनतेचे धैर्य शाबूत राखणे हे होते.
१५ ऑगस्ट १९४७
लॉर्ड माऊंटबॅटन यांना १९४७ मध्ये ब्रिटनचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय म्हणून पाठवण्यात आले. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी कामाचा भार हाती घेताच पुढील घोषणा केली,
“ब्रिटनने आपले भारतावरील साम्राज्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनतेचे प्रश्न भारताच्या स्वाधीन होतील. हिंदुस्तानवरचा ताबा आणि आमचे सार्वभौमत्व आम्ही संपवत आहेत. जून १९४८ च्या नंतर भारताच्या भूमीवर इंग्रजांचे राज्य व इंग्रजांची सेना राहणार नाही.”
या घोषणेनंतर भारत आणि ब्रिटिश सरकार यांच्या वाटाघाटीला जोर आला. अखेर असे ठरले की भारताची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण होतील. पंजाबची व बंगालची विभागणी केली जाईल. पंजाब आणि बंगालचा मुसलमान बहुसंख्यांक भाग पाकिस्तानला दिला जाईल. सर्व संस्थानांचे ब्रिटिश सार्वभौमत्व देखील संपेल. संस्थानांना सर्व करारातून मोकळे केले जाईल. संस्थानिकांनी भारतात विलीन व्हावे किंवा पाकिस्तानात विलीन व्हावे अथवा आपले स्वतंत्र अस्तित्व जपावे हे सर्वस्वी संस्थानिकांच्या निर्णयावर ठरेल. निजामाने फर्मान काढले. त्यात निजामाची भूमिका होती की हैद्राबाद हिंदुस्तान अथवा पाकिस्तान यात कुठेही जाणार नाही. ते स्वतंत्र राहणार आहे. नवे राष्ट्र निर्माण करण्याचा व तो टिकवण्याचा त्याचा निर्णय आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी करून इंग्रजांनी सत्ता स्वतंत्र भारताकडे हस्तांतरित केली. निजामाने हैद्राबाद एक स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. देशभर जनता भारताचे स्वातंत्र्य साजरी करत होती तर हैद्राबादची जनता भविष्याच्या अंधकारात बुडाली होती…