बाळ विनायकचा जन्म ३ फेब्रुवारी, १९९५ साली आपल्या आजोळी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या गावी झाला. विनायकचे पिता केशवराव कोरटकर तर आई गीताबाई.
वडील केशवराव कोरटकर मूळचे परभणी जिल्ह्यातील कोरट या लहानश्या गावातील एका गरीब ब्राह्मण कुटुंबातले. केशवरावांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. परंतु घरची गरिबी आणि जवळपास शाळेचा अभाव यामुळे केशवराव शिक्षण घेऊ शकत नव्हते. वयाच्या नवव्या वर्षी शिक्षणासाठी आपले गाव सोडून गुलबर्गा येथे आपले मेहुणे श्री. हरिराव शेष यांच्याकडे राहायला आले. गुलबर्ग्यात आल्यावर त्यांनी उर्दू भाषेचा अभ्यास केला. जेमतेम प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पैशाअभावी केशवरावांचे पुढील शिक्षण खुंटले. नाउमेद न होता वयाच्या पंधराव्या वर्षी केशवरावांनी तहसील कचेरीत नोकरी पत्करली. पुढे जाऊन स्व-कमाईच्या आधारावर वकिलीच्या परीक्षा दिल्या. केशवरावांनी १८९० साली वकिलीची सनद मिळवून गुलबर्गा सत्र न्यायालयात वकिली सुरु केली.
आई गीताबाई उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब गावाच्या श्री. प्रतापराव देशमुखांच्या कन्या. कळंब मध्ये प्रतापराव देशमुखांचे घराणे काही मोजक्या सधन आणि प्रतिष्ठितांत गणले जायचे. गीताबाई देशमुख घराण्याच्या सनातनी वळणाच्या होत्या. केशवरावरावांच्या घरची परिस्थिती साधारण असली तरी केशवराव स्वतः गुलबर्गा येथे एक प्रतिष्ठित वकील होते. देशमुखांनी गीताबाईंचा विवाह केशवरावांशी मोठ्या आनंदाने करून दिला.
केशवरावांचा वकिली व्यवसाय गुलबर्ग्याला जोमाने चालला होता. त्यातच भर म्हणून गीताबाईंनी खुश खबर दिली. गीताबाईंना दिवस गेले होते. केशवरावांच्या आणि गीताबाईंच्या आनंदाला पारावार उरला नाही. केशवराव गीताबाईंना काय हवं नको ते जातीनं बघू लागले. जसे दिवस उलटू लागले तसे केशवराव गीताबाईंना माहेरी देशमुखांकडे कळंब येथे बाळंतपणासाठी सोडून आले.
३ फेब्रुवारी १८९५. केशवराव नेहमीप्रमाणे कोर्टात गेले. त्यादिवशीच्या खटल्यांचा अभ्यास केला. तेवढ्यात कळंबच्या देशमुख वाड्याचा खास माणूस वकील-दालनात लगबगीने शिरला. केशवरावांकडे येत तो म्हणाला,
“मालक, खुश खबर आहे. तुम्ही वडील झालात. तुम्हाला पुत्ररत्न झाले.”
आनंदाने केशवरावांच्या डोळ्यात पाणी आले. केशवराव ताबडतोब कळंबकडे रवाना झाले. बाराव्या दिवशी मुलाचे बारसे करण्यात आले. मुलाचे नाव विनायक ठेवण्यात आले.
विनायकचा गोरापान चेहरा, बोलके डोळे लगेच कोणालाही आपलेसे करून घेणारे होते. केशवरावांना आणि गीताबाईंना आपल्या पहिल्या अपत्याचा मोठा लळा लागला होता. केशवराव कोर्टातले काम लवकर आटोपून विनायकांशी खेळायला घरी येत असत. नातेवाईक आणि मित्र मंडळींचा विनायकला पाहायला घरी कायम राबता असे. कोरटकरांच्या घरात विनायक मोठा होऊ लागला.
तत्कालीन सामाजिक परिस्थिती
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरचा तो काळ. भारतावर ब्रिटिश साम्राज्याची सार्वभौम सत्ता होती. ब्रिटिश साम्राज्य उलथून टाकायचे असेल तर चळवळ घराघरात पोहोचली पाहिजे याची जाणीव समाजातल्या शिक्षित वर्गात जाणवू लागली. चळवळ जर घराघरात पोहोचवायची असेल तर प्रथम सामान्य जनतेला शिक्षित करणे आवश्यक आहे. समाजातील अनिष्ट चालीरिती बंद झाल्या पाहिजेत आणि सामान्य जनता आपल्या स्वातंत्र्यासाठी जागृत झाली पाहिजे. यातूनच या काळात स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, बॅ. महादेव रानडे, बाळ गंगाधर टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले इत्यादींसारखे विचारवंत उदयाला आले, ज्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे महान कार्य केले.
इकडे मराठवाडा, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटक या प्रदेशावर निजाम घराण्याची सहावी पिढी राज्य करत होती. आठ तेलगू भाषिक जिल्हे, पाच मराठी भाषिक जिल्हे आणि तीन कानडी भाषिक जिल्हे अशा सोळा जिल्ह्यांचे हैद्राबाद संस्थान अस्तित्वात होते.
प्रथम या प्रदेशावर मुघलांचे राज्य होते. या प्रदेशाच्या देखरेखीसाठी मुघलांनी कमरुद्दीन निजाम याची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात दुही माजली. त्याचा फायदा घेत कमरुद्दीन निजामाने १७२४ मध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली.
निजामाचा राजवंश सुन्नी मुसलमान होता. संस्थानातील जवळपास ८६% प्रजा मात्र हिंदू होती. मुस्लिम केवळ ११% होते. संस्थानाची भाषा मात्र उर्दू होती. सर्व राज्य-कारभार उर्दू भाषेत चालू होता. तेलगू, मराठी आणि कन्नड या लोक-भाषांना राज्यकारभारात काहीही स्थान नव्हते. प्राथमिक म्हणजे चौथीपर्यंतचे शिक्षण फक्त आपापल्या मातृभाषेत घेता येत असे. त्यानंतर पाचव्या वर्गापासून शिक्षण फक्त उर्दू माध्यमातूनच उपलब्ध होते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक हायस्कूल असे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सातवीपर्यंतची शाळा म्हणजे मिडल् स्कूल होती. औरंगाबाद, गुलबर्गा, वारंगल आणि हैद्राबाद या चार विभागीय केंद्राच्या ठिकाणी इंटरपर्यंत शिक्षणाची सोय होती. त्यापुढील शिक्षण फक्त हैद्राबाद शहरात घ्यावे लागे.
संस्थानाच्या शासकीय नोकरीत मुसलमानांना प्राधान्य दिले जात होते. राज्यात हिंदू लोकसंख्या जरी ८६% असली तरी सरकार दरबारी नोकरीत केवळ १७% हिंदू होते. बाकी सर्व मुसलमान. त्यातही सचिव, विभाग प्रमुख, सुभेदार, जिल्हाधिकारी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कनिष्ठ न्यायाधीश, पोलीस अधिकारी या सर्वांत बहुतेक जागांवर मुसलमानच असत. जनतेला राज्यकारभारात भाग घेण्याचा अधिकार नव्हता. सामान्य नागरी हक्कही नव्हते. धार्मिक स्वातंत्र्यही अबाधितपणे उपभोगता येत नसे. नागरी स्वातंत्र्यावर अनेक बंधने घालण्यात आली होती. सभा, संमेलने, बैठका, मिरवणुका इत्यादींवर बंधने होती. मंत्रिमंडळाची थेट परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही उद्देशासाठी सभा घेतली जाऊ शकत नसे. व्यायामशाळा, आखाडे, ग्रंथालये, खाजगी शाळा याही सरकारी परवानगी शिवाय स्थापन करता येत नव्हत्या.
बाळकडू
विनायकाचा जन्म पायगुणाचा ठरला. केशवरावांना गुलबर्गा सत्र न्यायालयाचे क्षेत्र कमी पडू लागले. त्यातूनच हैद्राबादचे प्रसिद्ध वकील श्री. रामाचारी यांनी केशवरावांपुढे हैद्राबाद येथे येऊन उच्च न्यायालयात वकिली करण्याचा आग्रह धरला. त्यासाठी लागणारी सर्व मदत देऊ केली. केशवरावांसाठी ही एक फार मोठी संधी होती. यथायोग्य विचार करून केशवरावांनी हैद्राबाद येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. विनायक जेमतेम दीड वर्षाचा असताना केशवरावांचे कुटुंब हैद्राबादला स्थलांतरित झाले.
तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा केशवरावांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. “समाजात जागृती आणावयाची असेल तर प्रथम सामान्य जनतेला शिक्षित करणे आवश्यक आहे. समाजातील अनिष्ट चालीरिती बंद झाल्या पाहिजेत आणि सामान्य जनता आपल्या स्वातंत्र्यासाठी जागृत झाली पाहिजे.” या ठाम मताचे केशवराव होते.
गुलबर्ग्यात असताना केशवरावांचे पुण्याशी घनिष्ठ संबंध होते. पुण्यात आयोजित केल्या जाणाऱ्या वसंत व्याख्यान मालेत ते आवर्जून भाग घेत. यात अनेक विचारवंतांशी चर्चा करण्याचा योग केशवरावांना आला. लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी कर्वे यांच्यासारख्या नेत्यांशी केशवरावांचा वैयक्तिक संबंध जुळला. यातूनच गुलबर्ग्यातील त्यांचे स्नेही श्री. विठ्ठलराव तुळजापूरकर आणि श्री. गिरिराव घाटे जहागीरदार यांच्याबरोबर केशवरावांनी शिक्षण संस्था स्थापण्याची स्वप्ने पाहिली.
हैद्राबादला स्थलांतर केल्यानंतर केशवरावांचा संपर्क श्री. वामनराव नाईक, पंडित सातवळेकर यांसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समविचारी व्यक्तींशी आला. स्वराज्य स्थापण्यासाठी लागणाऱ्या तरुण पिढीची घडण करण्याचा ध्यास या लोकांनी घेतले.
केशवरावांचा परिचय श्री. कुंवर बहादुर यांच्याशी झाला. श्री. कुंवर बहादुर हे कट्टर आर्य समाजवादी होते. आर्यसमाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापिलेला एक धार्मिक पंथ. आर्य समाजाच्या मूलभूत कल्पनेप्रमाणे विश्वाचा निर्माता एक आहे आणि हिंदू धर्माची अचूक शिकवण केवळ वेद आणि उपनिषदात आहे. आर्य समाजाचा हिंदू धर्मातील पुराण ग्रंथांवर विश्वास नव्हता. आर्य समाजाच्या शिकवणीनुसार ‘शिक्षणास’ आद्य स्थान दिले आहे. तसेच वेदात उल्लेख नसलेल्या समाजातील भोंदू चालीरीतींचे निर्मूलन करणे आर्य समाजाचे कर्तव्य मानले जाते. सामाजिक रूढी निर्मूलनात जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रियांना समान अधिकार, विधवा विवाहाचे समर्थन, अनिष्ट परंपरेच्या नावाखाली हीन मानलेल्या जातीयांना सामाजिक अधिकार मिळवून देणे इत्यादी सुधारणांचा समावेश होता. केशवराव आर्यसमाजाच्या शिकवणुकीने प्रेरित झाले. केशवरावांनी आर्यसमाजाची दीक्षा तर घेतलीच परंतु आर्यसमाजाचा प्रचार हे आपल्या आयुष्याचे ध्येय मानले.
बाळ विनायक वडील केशवराव आणि आई गीताबाई यांच्या छत्र छायेखाली मोठा होत होता. साल १९०२. विनायक आता आठ वर्षांचा झाला होता. केशवरावांचे विचार आणि त्यांचे काम समजण्याचे त्याचे वय नव्हते. परंतु आपले वडील उदात्त विचारांचे आहेत आणि निश्चितच फार मोठे काम करीत आहेत याची जाणीव त्याला झाली होती. वडिलांबाबत त्याला नितांत आदर आणि प्रेम होते. समाजसेवेचे बाळकडू विनायकला मिळत होते…