३ फेब्रुवारी १९५६. विनायकरावांचा ६१ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला. विनायकरावांच्या ‘हीरक महोत्सवा’निमित्त “विनायकराव अभिनंदन ग्रन्थ” प्रकाशित करण्याचे प्रयोजन त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. श्री. काशिनाथ वैद्य आणि श्री. नरेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली बहुसंखीय समिती नेमण्यात आली. श्री. बन्सीधर विद्यालंकार यांची ‘प्रधान संपादक’ पदी नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण देशातून विनायकरावांचे अभिष्टचिंतन पर पत्र आली.
दिल्लीहून शुभ संदेश पाठवणाऱ्यात अनेक महानुभाव होते. त्यापैकी काहींची नावे पुढील प्रमाणे घेता येतील. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री श्री. गोविंद वल्लभ पंत, हैद्राबाद राज्याचे माजी एजंट जनरल श्री. के. एम. मुन्शी, मध्यप्रदेश राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्री. पट्टाभी सीतारामय्या, बिहारचे राज्यपाल श्री. दिवाकर, केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. लाल बहाद्दूर शास्त्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. करमरकर इत्यादी.
हैद्राबाद राज्याचे विनायकरावांचे मंत्रिमंडळातील सहकारी तसेच राज्यातील दिग्गज यांनीदेखील विनायकरावांचे तोंडभरून कौतुक केले. यात काही महत्वाची नावे पुढीलप्रमाणे होती. हैद्राबाद राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. एम. के. वेलोदी, हैद्राबाद राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. बी. रामकृष्ण राव, हैद्राबाद राज्याच्या विधान सभेचे सभापती श्री. काशिनाथ वैद्य, श्रीमती पद्मजा नायडू, राज्याचे गृहमंत्री श्री. दिगंबर बिंदू, आर्यसमाजाचे स्वामी अभेदानंद आणि आनंद स्वामी सरस्वती, मंत्री श्री. मेहंदी नवाज जंग, श्री. भाऊसाहेब हिरे, इत्यादी.
संसार पूर्ती
केशवरावांनी लावलेल्या समाजसेवेच्या रोपाचे विनायकरावांनी वृक्षात रूपांतर केले होते. गुरूच्या परीक्षेत ते अव्वल दर्जाने उत्तीर्ण झाले होते. इतकेच नव्हे तर विनायकरावांनी एक जेष्ठ पुत्र म्हणून वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा सर्व भर यशस्वीरीत्या आपल्या खांद्यावर घेतला. केशवरावांच्या मृत्यूसमयी विनायकरावांचे वय अवघे ३८ वर्षे होते. इतर भावंडे त्यांच्याहून लहानच होती. समाज सेवेच्या आणि देशप्रेमाच्या धकाधकीच्या जीवनात त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले नाही.
विनायकरावांचे दुसरे बंधू श्री. विठ्ठलराव यांचे प्राथमिक शिक्षण विवेकवर्धिनी शाळेत झाले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेले. श्री. विठ्ठलरावांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी मिळवून ते पुढील शिक्षणासाठी विलायतेला गेले. वेल्स मध्ये ऍबर विद्यापीठातून विठ्ठलरावांनी कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. वेल्स मधील आपले शिक्षण पूर्ण करत असतानाच वडील केशवरावांचे निधन झाले. परत येऊन विठ्ठलराव हैद्राबाद राज्यात न्यायाधीश पदावर रुजू झाले. विठ्ठलराव कलेचे प्रेमी आणि एक उत्तम कवी होते. त्यांनी ‘कुंदकळ्या’ हा कविता संग्रह तर “माझी विलायतेची सफर” आणि ‘हिटलरचे भूत’ ही पुस्तके प्रसिद्ध केली. विठ्ठलराव एक उत्तम वक्ते देखील होते. त्यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई या औरंगाबादचे प्रसिद्ध वकील श्री. सोमेश्वरराव अरळकर यांच्या कन्या. त्यांचे शिक्षण पुण्यातील हिंगणे विद्यालयात झाले.
विनायकरावांचे तिसरे बंधू रामराव यांचे प्राथमिक शिक्षण विवेक वर्धिनी तर पुढील शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी इंग्लंडमध्ये लंडन जवळ क्रायडॉन येथे विमान अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. श्री. रामराव यांनी कराची आणि मुंबई येथे हवाई सेवेत काम केले. रामरावांचा कल खेळाकडे असे. कोणताही खेळ असो, श्री. रामराव त्यात विशेष प्राविण्य मिळवत. त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रातील अनुभवावर आधारित काही लेखही लिहिले. त्यांच्या पत्नी श्रीमती सरला देवी या नागपूरच्या बॅरिस्टर देशमुख यांच्या कन्या.
विनायकरावांची सर्वात लहान बहीण श्रीमती गंगुताई यांनी पुणे येथील हुजरपागा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांचा विवाह श्री. श्रीनिवासराव शर्मा यांच्याशी झाला. श्रीनिवासराव यांनी मुंबई येथे बी. ए. आणि इंग्लंडमधील ‘इनर टेंपल’ मध्ये बॅरिस्टर पदवी मिळवली. श्रीनिवास रावांनी वकिली शिवाय राजकीय व सामाजिक क्षेत्रातही उच्चस्तरीय कार्य केले. लातूरच्या ‘महाराष्ट्र परिषदे’च्या अध्यक्षपदी श्रीनिवासराव शर्मा यांची निवड झाली. दुर्दैवाने श्री. श्रीनिवास शर्मांचे १९४२ मध्ये निधन झाले. त्यानंतर गंगुताई आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी मुख्यत्वे विनायकरावांनी घेतली.
दोन मुले व एक मुलगी असे विनायकरावांचे कुटुंब. त्यांचा मोठा मुलगा श्री. पुरुषोत्तम पुणे विद्यापीठातून एम.एस. सी. झाला. पुरुषोत्तम पुढील तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी परदेशात गेला. दुसरी मुलगी श्रीमती सुमित्रा बाई. त्या बी. एस. सी. उत्तीर्ण झाल्या. त्यांचे लग्न श्री. भालचंद्र जोशी यांच्याशी झाले. श्री. भालचंद्रराव मोमिनाबादच्या श्री. नारायणराव जोशी यांचे पुत्र. श्री भालचंद्र राव एम.ए. उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रख्यात अर्थतज्ज्ञ श्री. धनंजयराव गाडगीळ यांच्या देखरेखीखाली पुण्यात पीएचडी केले. श्री. विनायकरावांच्या सर्वात लहान मुलाचे नाव क्रांतीकुमार.