१९३८ ते १९४८ हा काळ केवळ विनायकरावांसाठीच नव्हे तर साऱ्या हैद्राबाद राज्याला अतिशय धकाधकीचा होता. परंतु केशवरावांनी घालून दिलेला शिक्षण प्रसाराचा आदर्श विनायकराव विसरू शकले नाहीत. हिंदी माध्यमातून शिक्षण देणारी संस्था सुरू करण्याची महत्वाकांक्षा विनायकरावांनी जोपासली होती. विनायकरावांची मातृभाषा जरी मराठी असली तरी त्यांचे सारे शिक्षण हिंदीत झाले होते. हिंदी आणि संस्कृतवर विनायकरावांचे कमालीचे प्रभुत्व होते. गुरुकुलातील राष्ट्रीय वातावरणात झालेल्या शिक्षणामुळे विनायकरावांचा ठाम विश्वास होता की जर भारत एकसंध ठेवावयाचा असेल तर हिंदी भाषेचा प्रसार सर्व देशभर झाला पाहिजे. नवीन पिढीला शालेय तसेच उच्च शिक्षण हिंदीतून देणे आवश्यक आहे. 

या विचारांनी प्रेरित होऊन विनायकरावांनी २० जुलै १९४० रोजी नवीन शाळेची स्थापना केली. वडिलांच्या  स्मृतीप्रीत्यर्थ शाळेचे नाव ‘केशव मेमोरियल हायस्कूल’ असे ठेवण्यात आले. शाळेचे उद्घाटन श्री. गोपाळराव बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. हैद्राबादमध्ये नारायणगुडा भागात शाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी २० सप्टेंबर १९४० रोजी श्री. घनश्याम सिंह गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आली. 

त्याकाळी निजाम राज्यातील कायद्याप्रमाणे स्थानिक भाषेच्या माध्यमातून शिक्षण केवळ प्राथमिक शाळेत दिले जाऊ शकत होते. माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण केवळ उर्दूमध्ये दिले जात असे. त्यामुळे केशव मेमोरियल मध्ये प्राथमिक शिक्षण हिंदी माध्यमात दिले जात असे तर माध्यमिक शिक्षण उर्दूत दिले जात असे. 

शाळेतील शिक्षण ‘वैदिक पद्धती’ने दिले जात असे. दर शनिवारी शाळेच्या पटांगणात वैदिक यज्ञ होत असे. त्यानंतर कवायत होत असे आणि नंतर पाठ्यक्रमास सुरुवात होत असे. 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी केशव मेमोरियल हायस्कूलच्या पटांगणात तिरंगा फडकवण्यात आला. भारतीय ध्वज लावण्यास निजामाने बंदी घोषित केलेली होती. ध्वजारोहण करणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठी हल्ला केला त्यात अनेक लोक जखमी झाले. 

१९४८ नंतर माध्यमिक शिक्षण हिंदीतून दिले जाऊ लागले.  १९५० साली विनायकरावांनी केशव मेमोरियल च्या अंतर्गत मुलींची शाळा सुरु केली.