१९१९ साली विनायकराव ‘विद्यालंकार’ ही गुरुकुलातली पदवी घेऊन स्वगृही हैद्राबादला परत आले. १४ वर्षे कांगडी येथे राहिल्याने विनायकराव आपली मातृभाषा जवळपास विसरले होते. हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर मात्र विनायकरावांचे कमालीचे प्रभुत्व होते. आईशी ते आपल्या तोडक्या मोडक्या मराठीत बोलत तर वडिलांसोबत बहुधा हिंदीत बोलत.
विनायकरावांना वडिलांबद्दल कमालीचा आदर होता. ते आपल्या वडिलांना गुरुस्थानी मानत. विद्यालंकार पदवी मिळाल्यानंतर काय करावे यासाठी त्यांनी केशवरावांना सल्ला विचारला. विनायकराव आपल्या वडिलांना अण्णा म्हणत,
"अण्णा, मला आर्यसमाजाच्या कामाला वाहून घेण्याची इच्छा आहे. परंतु याबाबत मला आपला सल्ला हवा आहे."
ऐकून केशवरावांना खूप आनंद झाला. विनायकरावांनी आपला समाजकार्याचा कित्ता गिरवावा ही त्यांचीही इच्छा होती. केशवराव म्हणाले,
"विनायकराव, तुम्ही समाजासाठी काम करावं ही माझी देखील इच्छा आहे. परंतु त्याआधी विलायतेला जाऊन तुम्ही ‘बॅरिस्टर’ पदवी घ्यावी असे मला वाटते. विलयतेत तुम्हाला वकिलीशिवाय खूप काही शिकायला मिळेल. त्याचबरोबर बॅरिस्टरची सर्वमान्य पदवी घेतल्याने पुढील आयुष्यात मार्गक्रमण करणे सोपे होईल."
विनायकरावांनी रावसाहेबांचा सल्ला शिरसावंद्य मानला आणि बॅरिस्टर पदवी मिळवण्यासाठी इंग्लंडला जाण्याचे ठरवले. इंग्लंड मधील प्रतिष्ठित विद्यापीठांशी विनायकरावांनी पत्रव्यवहार सुरु केला. उत्तर येईपर्यंत लागणारा वेळ आणि दरम्यान असलेली अनिश्चितता पाहून विनायकरावांनी पुणे येथे ‘शेतकी महाविद्यालया’त प्रवेश घेतला.
लवकरच लंडनच्या किंगज् कॉलेजचे उत्तर आले. त्यांनी विनायकरावांना प्रवेश देण्यास मान्यता दिली. विनायकराव आणि साऱ्या कुटुंबियांना आनंद झाला. विनायकराव शेतकी अभ्यासक्रम सोडून तयारीला हैद्राबादला परत आले. प्रवासाची तयारी करून १९२० मध्ये विनायकराव पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.
किंगज् कॉलेज
किंगज् कॉलेज, लंडन ही संस्था इंग्लंड मधील काही महत्वाच्या नावाजलेल्या विद्यापीठांपैकी एक मानली जाते. किंगज् कॉलेज ची स्थापना १८२९ साली लंडन येथे झाली. किंगज् कॉलेजमध्ये १८३१ साली कायदेविषयक पदवी उपक्रम सुरु झाला तर संस्थेमध्ये १९०९ साली वेगळे कायदेविषयक विभाग स्थापन करण्यात आले.
लंडनच्या मध्यवर्ती भागात थेम्स नदीच्या तीरावर स्ट्रॅन्ड भागात किंगज् कॉलेजचे आवार वसले आहे. किंगज् कॉलेजच्या या रम्य आवारात जगभरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. विनायकराव किंगज् कॉलेजमध्ये दाखल झाले.
इंग्लंडमधील दैनंदिन जीवन
इंग्लंडमध्ये असताना विनायकरावांचे दैनंदिन जीवन अतिशय साधेपणाचे होते. इंग्लंडमधील झगमगाटाला आणि प्रलोभनांना ते कधीच बळी पडले नाहीत. विनायकराव संपूर्ण शाकाहारी होते. इंग्लंडमध्ये असताना देखील ते स्वदेशी कपडे वापरत असत सिगारेट किंवा मद्याला त्यांनी कधी हात लावला नाही. परंतु इंग्रजांच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्यास विनायकराव कचरले नाहीत. वक्तशीरपणा, प्रगतीशील विचारधारणा इत्यादी इंग्रजांचे गुण विनायकरावांनी आत्मसात केले. इंग्लंडमध्ये विनायकरावांचा टेनिस खेळाशी संबंध आला. लवकरच विनायकराव टेनिस खेळात पारंगत झाले.
इंग्लंडमध्ये विनायकरावांचा स्त्रियांशी व तरुणींशी संपर्क आला. विनायकराव गुरुकुलात ब्रह्मचारी आयुष्य जगले होते. तरीही स्त्रियांशी विनायकरावांचे आचरण अतिशय सहजतेचे असे. याचे प्रमुख कारण त्यांच्या मनात असलेली स्त्रियांविषयीची सद्भावना हेच होते.
इंग्लंडमध्ये असतांना विनायकराव ख्रिश्चन धर्माचा आदर करीत असले तरी त्यांचा हिंदू धर्मावरील विश्वास अढळ होता. विनायकराव एका व्हाटसन नामक कुटुंबात ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहत असत. विनायकरावांचे व्हाटसन कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. सारे कुटुंब त्यांना आपल्या कुटुंबातीलच मानत. बऱ्याचदा विनायकरावांचे आणि श्री. व्हाटसन यांची धर्मावरून चर्चा होत असे. त्यात विनायकराव हिंदू धर्माचे मूळ विचार मोठ्या प्रभावीपणे मांडत. विनायकरावांचे धर्माबद्दलचे ज्ञान पाहून श्री. व्हाटसन चकित होत.
विनायकराव इंग्लंड मध्ये शिकत असताना एकदा त्यांना गुरुकुलातून विद्यार्थ्यांचे पत्र आले. गुरुकुलाचा वार्षिक उत्सव होता. त्यासाठी विनायकरावांनी संदेश पाठवावा ही विनंती होती. विनायकरावांनी संदेश पाठवला. त्यात ते म्हणतात,
“येथे इंग्लंडमध्ये असताना कधी माझे मन विचलित झालेच तर मी माझ्या ‘गुरुकुल माते’चे स्मरण करतो. गुरुकुलाचा सन्मान अढळ राहावा याची मनोकामना करतो. गुरुकुलाचा विचार माझ्या मनातील विचलित भावना दूर करते”
विनायकराव इंग्लंडमध्ये असताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इंग्लंडमध्ये आले होते. केशवराव यांनी ही बातमी विनायकरावांना कळवली आणि टिळकांची भेट घेण्याची सूचना केली. विनायकरावांनी लोकमान्यांची रीतसर वेळ घेतली आणि आपल्या भारतीय सहकाऱ्यांसोबत त्यांची भेट घेतली. भेटीत लोकमान्यांनी विनायकरावांना प्रेमाचा सल्ला दिला,
“विनायकराव, आपल्या वडिलांनी केलेल्या समाजसेवेची आणि राष्ट्रसेवेची जाण ठेवा आणि त्यांचे कार्य पुढे न्या”
या भेटीचा विनायकरावांवर फार मोठा प्रभाव पडला.
तत्कालीन राजकीय परिस्थिती
१९२० साली विनायकराव इंग्लंड मध्ये पोहोचले तेंव्हा पहिले महायुद्ध नुकतेच संपले होते. महायुद्धाचा फटका सर्वात जास्त ब्रिटनला बसला होता. महायुद्धाच्या आधी ब्रिटन जगातील सर्वात सधन आणि बलशाली देश होता. परंतु महायुद्धानंतर चित्र संपूर्ण पालटले होते. ब्रिटनने स्वतःला कर्जाच्या खाईत लोटले होते. ब्रिटनच्या अंतर्गत उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. ब्रिटन मधील बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. युद्धाच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी त्यांना अमेरिकेकडून कर्ज घ्यावे लागले होते. ब्रिटन मधील सामान्य जनतेवर फार मोठ्या प्रमाणावर कराचा बोजा लादण्यात आला होता. नुकत्याच संपलेल्या महायुद्धाच्या भयानक परिणामांना देश तोंड देत होता.
पहिल्या महायुद्धाचे पडसाद भारतावर देखील उमटले होते. जवळजवळ दहा लाख भारतीय गैर लढाऊ सैनिक पहिल्या महायुद्धात तैनात केले गेले होते. त्यातील जवळजवळ ३६,००० सैनिक मारले गेले तर १५०,००० जवान जखमी झाले. हजारो टन गहू, जूट, कापूस आणि खनिजे भारतातून निर्यात केली गेली. या सर्वांचा खर्च भारतातील व्हाइसरॉय सरकारने उचलला. पर्यायी हा सारा खर्च भारताच्या माथी लादला गेला होता.
भारतीयांनी दिलेल्या या बलिदानाची प्रशंसा करणे तर सोडाच परंतु याने भारतीयांवरील अत्याचारात कोणताही खंड पडला नाही. किंबहुना त्यात वाढच झाली. १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बाग येथे दहा हजार निशस्त्र नागरिकांवर गोळीबार केला गेला. यात जवळजवळ ४०० हून अधिक नागरिक मारले गेले व १२०० हून अधिक नागरिक जखमी झाले.
१९२० च्या सुमारास महात्मा गांधीजींचे नेतृत्व भारतीय राजकारणात पुढे आले. ४ सप्टेंबर १९२० ला महात्माजींनी असहकार चळवळीची सुरुवात केली. जालियनवाला बाग हत्याकांड आणि रॉलट ॲक्ट यांच्या विरोधात गांधीजींनी ह्या असहकार चळवळीस सुरुवात केली. रॉलट ॲक्ट मध्ये ब्रिटिश सरकारला अनेक अधिकार देण्यात आले होते. या अधिकाराप्रमाणे ब्रिटिश सरकार अनिश्चित काळासाठी एखाद्याला कैद करू शकत होते. यासाठी कोणतीही न्यायालयीन कारवाई आवश्यक नव्हती. ही असहकार चळवळ १९२२ पर्यंत चालू होती. या चळवळी दरम्यान अनेकांना अटक करण्यात आली. अखेर १९२२ मध्ये गांधीजींनाही अटक करण्यात आली.
विनायकराव या सर्व परिस्थितीचा अभ्यास करत होते. इंग्रजांच्या भारतात होणाऱ्या अत्याचाराने त्यांचे रक्त उसळत होते. लवकरात लवकर इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण करून मायभूमीच्या सेवेसाठी परतण्याचे स्वप्न विनायकराव पाहत होते.
बॅरिस्टर विनायकराव
किंगज् कॉलेजमधून तीन वर्षे मनापासून अभ्यास करून विनायकरावांनी LLB ची पदवी मिळवली. त्याचबरोबर विनायकरावांनी ‘मिडल टेम्पल’ येथून ‘बॅरिस्टर’ पदवी मिळवली.
‘बॅरिस्टर’ पदवी घेण्यासाठी इंग्लंडमधील विद्यालयातून LLB चे शिक्षण घ्यावे लागते. त्याचबरोबर काही ठराविक वकिली संस्थांचे “विद्यार्थी सभासदत्व” घेऊन पात्रता सत्राच्या परीक्षा द्याव्या लागतात. LLB पूर्ण करून या सत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला बॅरिस्टर ही पदवी मिळते. इंग्लंडमध्ये या प्रकारची पदवी बहाल करणाऱ्या चार संघटना आहेत. मिडल टेम्पल, इनर टेम्पल, लिंकन इन आणि ग्रे इन या त्या चार संघटना होत. विनायकरावांनी मिडल टेम्पल संघटनेच्या पात्रता परीक्षा देऊन ‘बॅरिस्टर’ पदवी मिळवली.
१९२२ साली बॅरिस्टर पदवी घेऊन अविरत समाजसेवेचे व्रत घेऊन विनायकराव मायदेशी परतले…