१९४१ मध्ये हैद्राबाद आर्य प्रतिनिधी सभेची निवडणूक झाली. विनायकरावांची पुन्हा एकदा निर्विवादपणे अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी मंत्रीपदी पंडित नरेंद्रजी यांची निवड करण्यात आली. 

पंडित नरेंद्रजी 

पंडित नरेंद्रजी हे हैद्राबाद आर्य प्रतिनिधी सभेचे झुंजार नेते होते. आपल्या घराण्यातील परंपरेने चालत आलेल्या  वतनदारीवर लाथ मारून नरेंद्रजींनी समाजकार्यात उडी घेतली होती. समाज कार्यात अडचण नसावी या हेतूने त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचे टाळले. श्री. रामचंद्र देहेलवी, विनायकराव आणि श्री. चंदुलाल यांच्या संपर्कात नरेंद्रजी आले आणि आर्यसमाजाच्या विचारांनी भारावून गेले. नरेंद्रजींनी आर्यसमाजासाठी स्वतःला वाहून घेतले. १९३४-३५ साली ‘वैदिक आदर्श’ या हैद्राबाद आर्य प्रतिनिधी सभेने चालवलेल्या साप्ताहिकाच्या प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी नरेंद्रजींनी पेलली होती. ‘वैदिक आदर्श’च्या परखड भाषेसाठी १९३५ साली या साप्ताहिकावर बंदी आली. 

१९३५ साली जशी ‘वैदिक आदर्श’ साप्ताहिक बंदी आली त्याचबरोबर पंडित नरेंद्रजींच्या भाषणावर देखील बंदी घालण्यात आली. नरेंद्रजींना हैद्राबादच्या सीमेवर नजरबंद करण्यात आले. नरेंद्रजींना हातावर हात ठेवून बसणे शक्य नव्हते. त्यांनी सीमापार नजरबंदीची आज्ञा मोडून शहराच्या  हद्दीत शिरण्याचे ठरवले. त्यांनी त्याप्रमाणे सरकारला पत्र पाठवले. ताबडतोब त्यांना अटक करून एक वर्षाचा कठोर कारावास ठोठावला. 

विनायकरावांनी या विरोधात हायकोर्टात अपील दाखल केले. विनायकरावांनी प्रतिसादाची शर्थ केली आणि नरेंद्रजींना निर्दोष मुक्त करवले.  विनायकरावांचे अतिशय निकटचे सहकारी म्हणून नरेंद्रजींनी कायम काम केले. 

आर्य परिषद १, उदगीर - १९४२

१९४२ मध्ये उदगीर येथे श्री. विनायक राव यांच्या अध्यक्षतेखाली पहिली आर्य परिषद मोठ्या उत्साहात साजरी झाली. १९३४-३५ पासून या परिषदेचे आयोजन करण्याचे प्रयत्न सुरू होते. १९४२ मध्ये सात ते आठ वर्षांच्या प्रयत्नांना फळ मिळाले. ही परिषद १२ ते १३ फेब्रुवारी १९४२ पर्यंत चालली, ज्यामध्ये २६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. परिषदेत आर्यसमाजाच्या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला,

“सत्याग्रहाच्या वेळी केलेल्या कराराकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे तरी सरकारने कराराची अंमलबजावणी त्वरित करावी. अजूनही धार्मिक निर्बंध तसेच चालू आहेत, तरी परिणामी निर्माण होणाऱ्या भीषण परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील.”

मात्र सरकारने आपल्या स्वभावाप्रमाणे याकडेही दुर्लक्ष केले. हिंदूंवर होणारे अत्याचार चालूच राहिले. मुसलमान गुंडांना वेळोवेळी पाठीशी घालण्याचे निजाम सरकारचे धोरण कायम राहिले. १० डिसेंबर १९४२ रोजी गुलबर्गा येथे तसेच  तत्पूर्वी अवराद शाहजहानी, जिल्हा बिदर येथील काही धर्मांध मुस्लिमांनी दंगल केली. दुकाने बंद करून हिंदूंच्या दुकानांवर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. त्यात हिंदूंची हत्या झाली. जळालेली सर्व दुकाने हिंदूंची होती. यामुळे हिंदूंचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि अनेक हिंदू जखमी झाले. पोलिसांनी या साऱ्या प्रकारात बघ्याची भूमिका निभावली. 

आर्य परिषद २ व ३ - १९४३, १९४४

१९४३ मध्ये हैद्राबाद संस्थानाची दुसरी आर्य समाज परिषद निजामाबाद येथे भरली. सभेच्या अध्यक्षपदी श्री. गणपत काशिनाथ शास्त्री यांना निवडण्यात आले. २५,००० कार्यकर्त्यांची भरती करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला. ही आर्य परिषद देखील गाजली. श्री. दत्तात्रय प्रसाद आणि पंडित नरेंद्रजी यांना प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपावरून अटक झाली. पंडित नरेंद्रजींना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. 

१९४४ मध्ये नारायणपेठ येथे श्री. सूरजचंद राय यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी आर्य परिषद झाली. ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी सभेत भाग घेतला. लोकांच्या मागणीची पूर्तता करून सभेने ‘सत्यार्थ प्रकाश’ ची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. याच वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर निजामाबादमध्ये जातीय दंगल उसळली होती. या दंगलीचा निःपक्षपातीपणे तपास करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी सभेने सरकारकडे केली. परंतु सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केले. 

आर्य परिषद ४, गुलबर्गा - १९४५

२२ ते २४ एप्रिल १९४५ दरम्यान चौथी हैद्राबाद राज्य परिषद गुलबर्गा येथे राजा नारायणलाल पित्ती  यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संमेलन अयशस्वी करण्यासाठी पोलिसांनी विविध प्रकार केले. सभेत दंगा घडवून आणला. सभेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी विनायकराव मंडपाच्या बाहेर पोलिसांपाशी गेले. पंडित नरेंद्रजी आणि श्री. गणपती  शास्त्री देखील त्यांच्याबरोबर बाहेर आले. पोलिस अधिकाऱ्यांशी बोलत असताना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी विनायकराव, श्री. गणपती शास्त्री, नरेंद्रजी यांच्यावर लाठीहल्ला केला. त्यात तिघेही जबरदस्त जखमी झाले. विनायकरावांचे सारे शरीर लाठ्यांच्या माराने काळेनिळे झाले. पंडित नरेंद्रजींचा पाय मोडला. तिघांनाही जवळच्या इस्पितळात हलवण्यात आले. 

या प्रकरणात शहरातील हिंदू चिडून उठले. संपूर्ण शहरात दंगल उसळली. रात्रभर शहरात अशांतता होती. अखेर विनायकराव शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहराच्या दौऱ्यावर निघाले. ठिकठिकाणी जमावासमोर विनायकरावांनी भाषण केले,

“गुलबर्गा ही आपले प्रिय नेते कैलासवासी न्यायमूर्ती केशवराव यांची कर्मभूमी आहे. न्यायमूर्ती केशवराव शांतीप्रिय होते. गुलबर्गा शहरात दंगा व्हावा यात त्यांच्या आत्म्याला अनेक वेदना होतील. तेंव्हा या दंग्याला आपण त्वरित विराम दिला पाहिजे.”

जमाव विनायकरावांच्या शब्दाच्या बाहेर जाणे शक्य नव्हते. पाहता पाहता शांतता प्रस्थापित झाली. पोलिसांच्या देखील जीवात जीव आला. गुलबर्गा येथे झालेल्या या  प्रकरणाविरोधात सर्व बाजूंनी निदर्शने झाली आणि पोलिसांनी केलेल्या अत्याचाराने सरकारवर नामुष्की ओढवली. अखेर त्यामुळे एक उपनिरीक्षक आणि चार हवालदारांना बडतर्फ करून सरकारने सारवासारवीचा प्रयत्न केला. 

आर्य परिषद ५, वारंगल  - १९४६

१९४६ मध्ये विनायकरावांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा वारंगल  येथे पाचवी परिषद झाली. या परिषदेला आलेल्या समाजाने दाखवलेला उत्साह आणि जल्लोष यातून सरकारला आर्य समाजाच्या ताकदीची जाणीव झाली. विनायकरावांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेत अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सभेने पंडित नरेंद्रजी यांच्यावर लादलेल्या सार्वजनिक भाषण निर्बंधांवर निषेध व्यक्त केला. परिणामी नरेंद्रजींवरची बंदी उठवण्यात आली. जनतेने नरेंद्रजींचे  मोठ्या उत्साहात स्वागत केले.

मेदक जिल्ह्यातील टेकमाळ या गावी आर्यसमाजाच्या शाखेची स्थापना होणार होती. स्थापनेसाठी  विनायकराव, पंडित नरेंद्र आणि इतर सहकारी पोहोचले. येथील आर्यसमाजाच्या शाखेला स्थानिक मुसलमानांचा कडवा विरोध होता. तेथील मुसलमानांनी नंग्या तलवारी आणि बंदुका घेऊन मिरवणूक काढली. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुर्दैवाने आर्यसमाज शाखेची स्थापना होऊ शकली नाही. परंतु हार न मानता विनायकरावजींनी पुन्हा कार्यक्रमाची योजना करण्याचा आदेश दिला. दिवस आणि तारीख ठरली. बरेच कार्यकर्ते आणि अधिकारी आदल्या दिवशीच टेकमाळला येऊन पोहोचले. उद्घाटनाच्या दिवशी सकाळी विनायकराव  टेकमाळला येऊन पोहोचले. 

स्थानिक मुसलमान मौलवी श्री. अबुल हसन कैसर साहेब विनायकरावांचे चांगले मित्र होते. कैसर साहेबांनी विनायकरावांना थेट टेकमाळ येथील दर्ग्याच्या आवारात गेले. दर्ग्याच्या बाहेर मुसलमानांचा मोठा जमाव जमला होता. कैसर साहेबांनी जमावाला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले.  मेदक जिल्ह्याचे पोलीस सुपरिंटेंडेंट श्री. चारी यांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता. सुदैवाने  कोणतीही दुर्घटना घडली नाही. विनायकरावांच्या हस्ते आर्यसमाज शाखेची स्थापना झाली. 

परत येताना रात्र झाली. विनायकराव, नरेंद्रजी आणि श्री. गंगाराम ऍडव्होकेट एका गाडीत हैद्राबादकडे निघाले. टेकमाळ पासून दहा मैलाच्या अंतरावर एका ओढ्यात दोन पठाण लपून बसले होते. गाडी जशी जवळ आली तसे लपून बसलेल्या पठाणांनी मोटारीवर गोळ्या झाडल्या.  श्री. गंगाराम ऍडव्होकेट यांच्या  कमरेच्या वरच्या बाजूला गोळी लागली व रक्त वाहू लागले. दुसरी गोळी नरेंद्रजींच्या गांधी टोपीला स्पर्श करून गेली. चालकाने गाडी पुढे काढली. नजीकच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार केले गेले. सुदैवाने विनायकरावंसकट तिघेही सुखरूप वाचले.  

ब्रिटिश सत्तेचा व्हॉईसरॉय लॉर्ड व्हॉवेल याची भारतातील कारकीर्द १९४६ च्या अखेरीस संपुष्टात येत होती. त्याआधी त्याने निजाम संस्थानाचा दौरा केला. त्यांच्या भेटीत निजामाच्या पंतप्रधानांनी हैद्राबादमध्ये एक जंगी मेजवानी बोलावली होती. वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रण दिले गेले. संस्थानातील वकील प्रतिनिधी म्हणून विनायकरावांना देखील आमंत्रण गेले. 

सारे अधिकारी आणि निमंत्रित व्यक्ती सुटाबुटात आले होते. विनायकरावांनी मात्र नेहमीप्रमाणे पांढरे खादीचे कपडे आणि गांधी टोपी घातली होती. जमलेल्या साऱ्यांच्या चेहऱ्यावर विनायकरावांचा पेहराव पाहून आठ्या पडल्या. शिरस्त्याप्रमाणे दोन रांगा करून सारे लॉर्ड व्हॉवेल यांची वाट पाहत होते. विनायकराव सरकारी अधिकारी नसल्याने विनायकरावांना दुसऱ्या रांगेत उभे करण्यात आले. 

वेळेप्रमाणे व्हाइसरॉय लॉर्ड व्हॉवेल दालनात आले. पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या काही अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन करत पुढे आले. त्यांची नजर दुसऱ्या रांगेत उभे असलेल्या गांधी टोपी घातलेल्या विनायकरावांकडे गेली. पुढे होऊन त्यांनी विनायकरावांशी हस्तांदोलन केले.  कार्यक्रमानंतर साऱ्यांनी झाल्या प्रकारचे आश्चर्य व्यक्त केले. विनायकराव हसत म्हणाले,

“गांधी टोपीकडे व्हॉईसरॉय चालत आले. लक्षात ठेवा, गांधी टोपीवाल्यांचे राज्य लवकरच येणार आहे.”

‘आर्यभानू’ नियतकालिक

१९३८ - ३९ च्या सत्याग्रहानंतर आर्यसमाजाला एखाद्या  साप्ताहिक अथवा मासिकाही गरज भासू लागली. आर्यसमाजाच्या उपक्रमांची कार्यकर्त्यांना माहिती देणे, नेत्यांना आपले विचार मांडणे यासाठी एका पत्रकाची आवश्यकता होती. परंतु त्याकाळी कोणतेही पत्रक सुरु  करण्यासाठी सरकारी परवानगीची आवश्यकता असे. आर्यसमाजाला असे पत्रक सुरु करू द्यावे यासाठी विनायकराव सरकारकडे पाठपुरावा करत होते. सरकार अशी परवानगी देणे सहसा टाळत असे. त्यातून आर्यसमाजाला अशी परवानगी मिळणे तर अशक्य होते. 

सुदैवाने सर मिर्झा इस्माईल यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. मिर्झा इस्माईल थोडे उदारमतवादी होते. त्यांनी राज्यात जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणून सरकारच्या धोरणात बदल झाला आणि १९४६ मध्ये आर्यसमाजाला आपले पत्रक सुरु करण्याची परवानगी मिळाली. आर्यसमाजाच्या कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट उसळली. राज्यात छापले जाणारे हे पहिले हिंदी वृत्तपत्र होते. वृत्तपत्राचे नाव ‘आर्य भानू’ असे ठेवण्यात आले. त्याच्या संपादकीय कार्याची जबाबदारी अर्थात विनायकराव यांच्यावर टाकण्यात आली. त्यांच्या मदतीस श्री. कृष्णदत्त यांची नियुक्ती करण्यात आली. नंतर श्री. रिभुदेव शर्मा आणि श्री. विनय कुमार यांनी सहसंपादक म्हणूनही काम केले. 

मिर्झा इस्माईल यांनी ‘आर्य भानू’ ला परवानगी तर दिली. इतकेच नव्हे तर जातीय दंगलीमुळे दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या बऱ्याच हिंदूंची त्यांनी सुटका केली. यामुळे परिस्थितीत काही सुधारणा होण्याची आशा असताना सर मिर्झा इस्माईल यांना मुस्लिमांचा तीव्र विरोध होऊ लागला आणि त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन परतावे लागले.

विनायकरावांना साहित्याची अतिशय आवड होती. आर्यभानू पत्रकात ते वैचारिक लेख तर लिहीतच. परंतु इतर माध्यमातून देखील विनायकराव आपले साहित्यिक लेख प्रकाशित करत. विनायकरावांनी “चाबूक” नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्यांच्या अनेक हिंदी लेखांचे संकलन या पुस्तकात केले आहे. त्यांचे लेख प्रामुख्याने व्यक्ती आणि मनोविश्लेषण विषयांवर आधारित असत. हास्य, सहानुभूती, वेदना अशा साहित्य रसाचा वापर विनायकराव आपल्या लेखात लीलया करीत. “दुनिया तेरा नाम झूठ है”,  “पुने का आतिथ्य”, “माई कीर्तन प्रसन्न हुं” , “जंगल कि कली”, “हंसू या रोउ”, “तहसीलदार”, “परिवर्तन”, “पुनर्मीलन”, “छुटकारा”, “टेलेफोन”, “परामर्श” इत्यादी लेख खूप गाजले.