१९३२ नंतर हैद्राबाद संस्थानातील राजकीय वारे झपाट्याने बदलत होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला असलेले नेत्यांचे मवाळ धोरण बदलण्याच्या मार्गावर होते. निजामाच्या दंडेलशाही राजवटीचा हिंदू प्रजेला होणारा जाच दिवसेंदिवस वाढत होता. त्याला प्रखर विरोध करणे अनिवार्य होते. केशवरावांच्या मृत्यूनंतर हैद्राबाद आर्यसमाजाला एका खंबीर नेतृत्वाची आवश्यकता होती. अशा वेळेस आर्यसमाजाचे नेतृत्व विनायकरावांकडे निर्विवादपणे आले. 

साल १९३३. हैद्राबाद आर्य प्रतिनिधी सभेच्या प्रधानपदी विनायकरावांची नियुक्ती झाली. १९३३ ते १९३८ हा काळ निजामाच्या वाढत्या जुलुमांचा काळ होता. अशा  परिस्थितीतही विनायकरावांनी आर्यसमाजाच्या प्रचाराची मोहीम उघडली. मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात आर्यसमाजाच्या अनेक नवीन शाखा उघडल्या. १९३५ पर्यंत हैद्राबाद राज्यात ५०,००० हून अधिक आर्यसमाजी कार्यकर्ते तयार झाले. 

वाढता संघर्ष 

१९३३ मध्ये हैद्राबाद पोलिसांनी आर्यसमाजाचा प्रचार, उत्सव आणि मिरवणुकांवर कडक निर्बंध घालण्यास सुरुवात केली. श्री. चंद्रभानू, श्री. रामचंद्र देहलवी यांच्यासारख्या आर्यसमाजींना प्रक्षोभक भाषणे करण्याच्या आरोपावर हद्दपार करण्यात आले. विनायकरावांच्या नेतृत्वाखाली आर्य प्रतिनिधी सभेने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. राज्यातील इतरधर्मियांप्रमाणे आर्यसमाजाला त्यांच्या धार्मिक कार्यात पूर्ण स्वातंत्र्य देण्यासाठी हैद्राबाद सरकारवर दबाव आणला. या मागणीकडे सरकारने केवळ दुर्लक्षच केले नाही तर निर्बंध अधिक तीव्र होऊ लागले. 

विनायकरावांनी केंद्रीय आर्यसमाजाचे हैद्राबादमधील अत्याचारांकडे लक्ष वेधले. १९३४ मध्ये ‘इनलँड रेव्हेन्यू रिप्रेझेंटेटिव्ह असेंब्ली’, दिल्ली यांनी हैद्राबाद सरकारला एक निवेदन पाठवले. परंतु धार्मिक भावनेत पक्षपात होत असल्याचे निजाम सरकारने नाकारले.  परिस्थितीचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी दिल्लीहून एक शिष्टमंडळ आले. या नेत्यांनी राज्यभर दौरा केला. त्यांचा दौरा चालू असताना पोलीस शांत बसले आणि त्यांची पाठ फिरताच अत्याचाराला पुन्हा सुरुवात झाली. 

पोलिसांचे निर्बंध आणि अडथळे इतके गंभीर आणि व्यापक झाले की सण, मिरवणुका, महान व्यक्तीच्या जन्म किंवा मृत्यूच्या सभा, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक भाषणे, धार्मिक ग्रंथ आणि मासिके यांचे प्रकाशन, शैक्षणिक संस्थांची स्थापना, आखाडे, ओम ध्वज फडकवणे आणि हवन  कुंडांवरही निर्बंध लादण्यात आले. 

आर्यसमाजाने सुरु केलेले ‘वैदिक आदर्श’ या उर्दू साप्ताहिकावर सरकारने १९३५ मध्ये बंदी आणली. साप्ताहिकाचे संपादक श्री. नरेंद्रजी यांना हद्दपारीची शिक्षा ठोठावण्यात आली. विनायकरावांनी याचा ठासून विरोध केला. परंतु निजाम सरकारने दाद दिली नाही. पुढे नरेंद्रजींनीं शहरात प्रवेश करण्याची धमकी दिली. त्यात त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर चाललेल्या खटल्यात विनायकरावांनी त्यांचे वकील म्हणून काम केले आणि त्यांची निर्दोष मुक्तता केली.  

१९३६ च्या वर्षी उमरगा गावी पोलिसांनी श्रीरामचंद्र नावाच्या आर्यसमाजी व्यक्तीकडून ‘सत्यार्थप्रकाश’ ग्रंथ ताब्यात घेतला. पोलिसांच्या या विचित्र आदेशाचा बदला म्हणून राज्यभरातल्या आर्यसमाजींनी ‘सत्यार्थप्रकाश’ च्या अनेक प्रती श्री रामचंद्रांना पाठवल्या. पोलिसांच्या या कृतीबद्दल आर्यसमाजाने चहूबाजूंनी संताप व्यक्त केला तेव्हा पोलिसांना ‘सत्यार्थप्रकाश’ची जप्त केलेली प्रत परत करावी लागली. 

डिसेंबर १९३७ मध्ये, गुंजोटी येथे श्री. वेदप्रकाश नावाच्या सच्च्या आर्यसमाजी कार्यकर्त्याची स्थानिक मुसलमान गुंडांनी निर्घृण हत्या केली. मारण्यापूर्वी, त्याला इस्लाम स्वीकारण्यास सांगितले गेले, ज्याला त्याने मोठ्या शौर्याने नकार दिला. यावर तलवारीने त्याची मान धडापासून वेगळी करण्यात आली. हैद्राबाद आर्यसमाजाचे ते पहिले हुतात्मा. या निर्घृण हत्येविरोधात संपूर्ण देशाने संताप व्यक्त केला.

१६ मार्च १९३८ रोजी गुलबर्ग्यामध्ये होळी साजरी केली जात होती. गर्दीतून जात असलेल्या काही मुस्लिमांवर अचानक रंगाचे काही शिडके पडले. परिणामी मुस्लिमांनी त्या मेळाव्यावर हल्ला केला. या दंगलीत दोन्ही बाजूचे अनेक लोक जखमी झाले. पोलिसांना संधी मिळाली. हिंदू आणि आर्यसमाजींना अटक करून त्यांच्यावर आरोप दाखल केले. 

१९३८ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर उदगीर जिल्ह्यात बिदर येथे हिंदू मुसलमानांत मोठी दंगल झाली. पोलिसांनी केवळ आर्यसमाजींना अटक केली. या दंगलीत आर्यसमाजाला मोठी किंमत मोजावी लागली. आर्य प्रतिनिधी सभेचे उपाध्यक्ष श्री. श्यामलाल यांना त्यांच्या २० साथीदारांसह अटक करण्यात आली. आणि १७ डिसेंबर १९३८ रोजी त्यांना बिदर तुरुंगात कैद करण्यात आले. कैदेत असताना विषप्रयोग करून त्यांची  हत्या करण्यात आली. श्री. श्यामलाल यांच्या निधनाने आर्यसमाजाचे मोठे नुकसान झाले. या हत्येविरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात आला.

धूळपेठ दंगल 

१६ एप्रिल १९३८ रोजी हैद्राबाद शहरातील धूळपेठ नावाच्या परिसरात काही मुसलमान गुंडांच्या उपद्रवामुळे जातीय दंगल उसळली आणि संपूर्ण शहरात अशांतता पसरली. शहरभर हिंदू - मुसलमान दंगे उसळले. यात मुसलमान गुंडांवर कारवाई झाली नाही. परंतु २१ आर्यसमाजी कार्यकर्त्यांना कैदेत डांबण्यात आले. विनायकराव जातीने लक्ष घालून शांतता प्रस्तापित करण्यात व्यस्त होते. 

एका दंग्याच्या ठिकाणी जाऊन विनायकराव परत येत होते. जागोजागी पोलिसांनी नाकेबंदी केली असल्याने विनायकरावांची गाडी वाट मिळेल त्या रस्त्याने पुढे चालली होती. अशातच गाडी एका मुसलमान मोहल्ल्यात आली. समोर प्रचंड मुसलमान समुदाय उभा होता. गाडीत विनायकराव आहेत हे कळले असते तर जमावाने निश्चितच गाडीवर हल्ला चढवला असता. परंतु गाडीच्या चालकाने शिताफीने गाडी जमावातून बाहेर काढली. ईश्वर कृपेने विनायकराव सुखरूप त्यांच्या जामबाग मधील राहत्या घरी पोहोचले. 

परंतु विनायकरावांच्या घराभोवती अनेक मुसलमान जमावाचा गराडा पडला होता. मजलिस नेते जमावाला उत्तेजित करत होते. विनायकरावांची गाडी तेथे येताच  विनायकरावांचे अतिशय चांगले मित्र श्री. मेहरसिंग आणि त्यांची शीख साथीदार विनायकरावांच्या रक्षणाला तेथे आले. त्यांनी विनायकरावांच्या गाडीभोवती कडे केले.  मुसलमान गुंडांचा जमाव विनायकरावांच्या जीवावर उठला होता. मेहेरसिंगांचा काटा काढून विनायकरावांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत होता. 

त्याकाळी क्रॉम्प्टन नावाचा इंग्रज अधिकारी हैद्राबादमध्ये तैनात होता. त्याला या जमावाची कल्पना मिळाली होती. तो घटनास्थळी ताबडतोब पोहोचला. त्याच्या सोबत पोलिसांची कुमक होतीच.  पोलिसांनी जमावाला पांगवले. विनायकराव सुखरूप घरात शिरले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. 

दंगा शांत झाल्यानंतर काही दिवसांनी एक मुसलमान गृहस्थ विनायकरावांना भेटावयास आले. विनायकरावांच्या समोर येताच त्या गृहस्थाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. थोडे शांत झाल्यावर ते म्हणाले, 

“साहब, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये आपल्या शिफारशींवर मला कर्ज मिळाले. त्यातूनच मी तिचे लग्न लावून देऊ शकलो. त्या उपकाराची अंशतः परतफेड मी काही दिवसापूर्वी करू शकलो.” 

या प्रकाराचा उलगडा विनायकरावांना झाला नाही. ते उद्गारले,

“मला काही समजले नाही.”

गृहस्थाने प्रकरणाची उकल केली,

“साहब, काही दिवसांपूर्वी तुम्ही धूळपेठ भागात आला होतात. तुमच्या गाडीला एका जमावाने अडकवले. गाडीत तुम्ही आहात हे त्यांना कळले असते तर त्यांनी तुमचा जीव घेतला असता. परंतु त्यांनी तुम्हाला ओळखले नाही. त्या जमावात मी पण होतो. मी तुम्हाला ओळखले. परंतु सगळ्यांना तुमची ओळख सांगण्याची माझी हिम्मत झाली नाही. मी चुपचाप तेथून निघून गेलो” 

भाई शामलालजी 

भाई शामलालजी हे हैद्राबाद आर्यसमाजाचे एक प्रमुख आधारस्तंभ आणि विनायकरावांचे निकटवर्तीय सहकारी होते. भाई शामलालजींचा जन्म १९०३ साली बिदर जिल्ह्यातील भालकी या गावी झाला. भाई श्यामलालजींचे प्राथमिक शिक्षण हल्लीखेळ या लहानश्या गावी झाले तर त्यांचे पुढील शिक्षण गुलबर्गा येथे झाले. भाई श्यामलालजींनी १९२५ साली वकिलीची परीक्षा पूर्ण केली व ते उदगीर येथे स्थायिक झाले. १९२६ साली भाई शामलालजी श्रद्धानंद स्वामींच्या संपर्कात आले.  श्रध्दानंदजींच्या  सानिध्यात भाई शामलालजींनी आर्यसमाजाची दीक्षा घेतली.  भाई श्यामलालजींनी अविवाहित राहून स्वतःला आर्यसमाजाच्या कार्यास वाहून घेतले.  

दुर्दैवाने श्यामलालजींना कुष्ठरोगाने ग्रासले. रोग जेव्हा जास्त बळावला तेव्हा विनायकरावांच्या आग्रहाखातर काही दिवस उपचाराकरिता ते हैद्राबाद येथे विनायकरावांच्या घरी राहिले. कुष्ठरोग संसर्गजन्य असल्याने विनायकराव कोणालाही  श्यामलालजींच्या खोलीमध्ये जाऊ देत नसत. श्यामलालजींचे अंथरूण व खोली साफ करणे विनायकराव स्वतः करत. त्या दिवसात विनायकरावांनी श्यामलालजींची भावाप्रमाणे मनोभावे सेवा केली. पुढे जाऊन श्यामलालजींची कैदेत पोलिसांकरवी हत्या करण्यात आली हे आपण  पाहिलेच आहे. 

किशनगंज ध्वजारोहण 

आर्यसमाजात होळी आणि दसरा हे दोन सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात. दसऱ्याच्या दिवशी भगवा झेंडा घेऊन मोर्चा निघत असे व शेवटी ध्वजारोहणाचा शानदार कार्यक्रम होत असे. निजाम राजवटीत कोणत्याही मोर्चाला अथवा धार्मिक कार्यक्रमांना सरकारी परवानगी अनिवार्य होती. 

सालाबादप्रमाणे किशनगंज आर्यसमाज शाखेने  ध्वजारोहणासाठी परवानगी मागितली. परंतु अहमद शाह नामक स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने कारण नसताना परवानगी नाकारली. शाखेच्या कार्यकर्त्यांनी विनायकरावांकडे धाव घेतली. विनायकराव पोलीस अधिकाऱ्याला भेटायला गेले. विनायकराव स्वतः परवानगी मागायला आले हे पाहून पोलीस अधिकारी गर्वाने फुलून गेला. कुत्सित हसत विनायकरावांना म्हणाला,

“विनायकराव, मी परवानगी देईन. परंतु एका अटीवर.  तुम्ही स्वतः मोर्च्यात झेंडा घेऊन गेले पाहिजे.”

पोलीस अधिकाऱ्याची अपेक्षा होती, विनायकराव या गोष्टीला तयार होणार नाहीत. परंतु झाले उलटे. विनायकरावानी स्मित केले आणि म्हणाले,

“मला तुमची अट मान्य आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या, तुम्ही सामान्य परवानगी दिलीत तर शाखेचे ४०० ते ५०० कार्यकर्ते  समारंभात भाग घेतील. परंतु जर मी झेंडा घेऊन समारंभात आलो तर ही संख्या दहा ते बारा हजारावर जाईल. त्या परिणामाची जबाबदारी आपल्यावर राहील” 

पोलीस अधिकाऱ्याला आपली चूक उमगली. त्याने जास्त उहापोह न करता मुकाट्याने परवानगी दिली. कार्यकर्त्यांनी जल्लोष करत थाटाने मिरवणूक काढली,

“उठाये ध्वज धर्म का हम फिरेंगे,

इसीके लिये हम जियेंगे, मरेंगे” 

१९३८ चा सत्याग्रह 

निजामाच्या जुलमी राजवटीला सीमा उरली नव्हती. आर्यसमाजाने वारंवार मागणी करूनही त्यांना किमान धार्मिक स्वातंत्र्य देण्यास निजाम तयार नव्हता. विनायकरावांनी दिल्ली येथील केंद्रीय आर्यसमाजाला यात लक्ष घालण्याची आणि व्यापक सत्याग्रह योजण्याची विनंती केली. विनायकरावांच्या आवाहनाला उत्तरप्रदेश आणि देशाच्या इतर भागातून असामान्य प्रतिसाद मिळाला. विनायकरावांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि सत्याग्रहासाठी मोठ्या निधीची व्यवस्था केली. केंद्रीय समितीने आवश्यकता मान्य करून व्यापक सत्याग्रहाची योजना केली. सत्याग्रहाचे संपूर्ण अधिकार नारायण स्वामी महाराजांना दिले. डिसेंबर १९३८ मध्ये नारायण स्वामींनी राज्यव्यापी सत्याग्रह  पुकारला. निजाम सरकारकडे पुढील मागण्या मांडण्यात आल्या:

प्रत्यक्ष सत्याग्रह सुरु करण्याअगोदर निजाम सरकारला पुन्हा एकदा मागण्यांचे पत्र पाठवण्यात आले. परंतु सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. सरकारला आर्यसमाजाचा सत्याग्रह कोणत्या शक्तीने आणि वेगाने वाढेल याची कल्पना नव्हती. केंद्रीय सत्याग्रह समितीच्या हाकेवर भारतातील सर्व प्रांतातील आर्यसमाजी गट हैदराबादच्या दिशेने निघाले. नारायण स्वामी महाराज सत्याग्रहाचे पहिले अधिकारी म्हणून निवडले गेले. महाराजांसहित एकेकांना सरकारने अटक केली. त्यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. 

पहिले अधिकारी श्री. नारायण स्वामी महाराज यांच्या नंतर, २. श्री. कुंवर चांदकरण  शारदा, ३. श्री. खुशालचंद्र, ४. श्री. राजगुरू धुरेंद्र शास्त्री, ५. श्री. देवव्रत, ६. श्री. महाशय कृष्ण आणि ७. श्री. ज्ञानेंद्र असे सात प्रमुख अधिकारी नेमण्यात आले. प्रत्येकांच्या नेतृत्वाखाली अनेक आर्यसमाजी  कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले. त्यांना एक किंवा दोन वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला. अंदाजे १२,००० सत्याग्रहींनी सत्याग्रहात भाग घेतला होता. त्यातील ५,००० हून अधिक सत्याग्रही हैद्राबाद राज्यातील होते. 

आठवे अधिकारी म्हणून विनायकरावांचे नाव पुढे आले. विनायकरावांनी २१ जुलै १९३९ रोजी सत्याग्रह सुरु होईल याची घोषणा केली. हैद्राबाद राज्यात उत्साहाचे उधाण आले. राज्यातील कार्यकर्त्यांची सत्याग्रहात भाग घेण्यासाठी रीघ लागली. सर्व देशातून ३,५०० कार्यकर्ते सीमेवर येऊन ठाकले. विजयवाडा, ढोलापूर, बार्शी, अहमदनगर, मनमाड, पुसद, चांदा इत्यादी सीमेवरील शहरात छावण्या उभ्या राहिल्या.

विनायकरावांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला,

“आम्ही १,००० आर्यसमाजी कार्यकर्ते बरोबर घेऊन निर्वाणीच्या सत्याग्रहाची सुरुवात करत आहोत. हे सर्व कार्यकर्ते हैद्राबाद राज्यातील असतील. सत्याग्रहाच्या तीव्रतेची सरकारने वेळीच दखल घ्यावी.”

विनायकरावांचे खंबीर नेतृत्व निजाम सरकारला चांगले  माहीत होते. विनायकराव जे बोलतील ते करतील याची चांगली कल्पना अधिकाऱ्यांना होती. त्यातच आर्यसमाजाच्या हैद्राबाद येथील सत्याग्रहाचा विषय ब्रिटिश पार्लमेंट मध्ये चर्चिला गेला. ब्रिटिशांनी देखील निजामाला हा विषय मिटवण्याचा आदेश वजा सल्ला दिला. त्याकाळी अकबर हैदरी हे निजाम राज्याचे पंतप्रधान होते. परिस्थितीची जाणीव हैदरींना चांगलीच झाली. त्यांनी निजामाला नमते घेण्यासाठी समजूत काढली. विनायकरावांना  आमिष दाखवून सलोखा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु विनायकरावांनी त्याला साफ इन्कार केला. विनायकरावांनी निक्षून सांगितले, 

“संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आर्य प्रतिनिधी सभा माघार घेणार नाही. ठरल्याप्रमाणे २१ जुलै रोजी सत्याग्रहाची सुरुवात होईल.”

आर्यसमाजाच्या विनायकरावरुपी आठव्या अवतारापुढे निजामाने नमते घेतले. १७ जुलै १९३९ रोजी निजाम सरकारने शरणागती पत्करली. सरकारने धार्मिक स्वातंत्र्यास पूरक धोरणाचा फतवा काढला… 

१९३८-३९ चा आर्यसमाजी सत्याग्रह हैद्राबादच्या स्वातंत्र्यलढ्याची नंदी ठरली.