३१ ऑक्टोबर १९५६ रोजी बी. रामकृष्ण राव यांचे मंत्रिमंडळ संपुष्टात आले. श्री. बी. रामकृष्ण राव यांच्या सरकारने राज्याच्या त्रिभाजनाचा अभूतपूर्व निर्णय घेतला. हैद्राबाद राज्य बरखास्त करण्यात आले. मराठी भाषिक मराठवाडा प्रांताचे औरंगाबाद, नांदेड, परभणी, उस्मानाबाद आणि बीड असे पाच जिल्हे होते. हे पाच जिल्हे महाराष्ट्रात जोडण्यात आले. बिदर, गुलबर्गा आणि रायचूर हे कानडी भाषिक तीन जिल्हे कर्नाटकाला जोडण्यात आले. राहिलेले आठ तेलगू भाषिक जिल्हे आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आले.
त्रिभाजनाचा निर्णय हैद्राबाद राज्याचे स्वतंत्र भारतात एकसंध विलीनीकरण होण्यासाठी आवश्यक होता. परंतु या प्रक्रियेत हैद्राबाद मधील ‘मुल्की’ जनतेला फार मोठे बलिदान द्यावे लागले.
नवीन आंध्र प्रदेशची राजधानी हैद्राबाद घोषित करण्यात आली. परंतु राज्याच्या प्रशासनाची भाषा इंग्रजी करण्यात आली. मुल्की अधिकाऱ्यांना इंग्रजी पेक्षा उर्दू जवळची होती. आंध्र भागातील अधिकारी ब्रिटिश साम्राज्यातील मद्रास विभागातले होते. त्यांना मात्र इंग्रजीचे चांगले ज्ञान होते. त्यामुळे आंध्र भागातील अधिकारी यांचे प्रशासनात वर्चस्व झाले. इकडे मराठी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र प्रशासनात येण्याची मुभा होती. परंतु यात त्यांच्या जेष्ठतेवर अनिष्ट परिणाम झाला. शासकीय भाषेची समस्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातही आली.
हैद्राबादच्या विलीनीकरणाचा आघात हैद्राबादच्या राजकीय व्यक्तींवर देखील फार मोठ्या प्रमाणावर झाला. मराठवाड्यातील मराठी भाषिक नेत्यांना मुंबईच्या राजकारणात नव्याने समीकरणे जोडावी लागणार होती. कानडी भाषिक नेत्यांना बंगलोर मध्ये नव्याने सुरुवात करावी लागणार होती. आंध्रची राजधानी हैद्राबाद जरी असली तरी तेथील राजकारणावर आता पूर्वी ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या आंध्र प्रांतातील लोकांचे वर्चस्व झाले होते.
तेलगू भाषिक बी. रामकृष्ण राव यांनी विधिमंडळाचे राजकारण सोडले. त्यांची नियुक्ती केरळचे राज्यपाल म्हणून करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ यांनी राजकीय संन्यास पत्करला. विनायकरावांसमोर देखील हाच प्रश्न होता. हैद्राबाद मध्ये कोणताही सामाजिक अथवा राजकीय कार्यक्रम कै. केशवराव कोरटकर आणि कै. वामनराव नाईक यांच्या फोटो वंदनेने होत असे. विनायकरावांना आपले वडील आणि गुरु केशवराव यांच्याबाबत नितांत आदर होता. मुंबई आणि बंगलोर येथे राजकीय संस्कृती निराळी होती. विनायकरावांना ते पटण्यासारखे नव्हते.
विनायकरावांनी हैद्राबादमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. परंतु नवीन आंध्र नेत्यांसोबत विनायकरावांचे मन रमणार नव्हते. विनायकरावांनी लोकसभेच्या जागेसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. विनायकरावांसाठी निवडणूक जिंकणे हा काळजीचा विषय नव्हता. त्यांनी केवळ तसा निर्णय घेण्याचा अवकाश होता.
१९५७ च्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीस विनायकरावांना हैद्राबाद शहरातून तिकीट देण्यात आले. सुलतान बाजार, बेगम बाजार, आसिफ नगर, हायकोर्ट, मालकापेट, याकतपुरा, फत्तरगट्टी हा इलाका या मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला होता.
विनायकराव 66% मतांनी लोकसभेवर निवडून आले. दुसऱ्या लोकसभेने ५ एप्रिल १९५७ ते ३१ मार्च १९६२ हा संपूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा सर्व कार्यकाळ विनायकराव लोकसभेचे सभासद राहिले.
सूर्यास्त
आयुष्यभराच्या धकाधकीच्या जीवनात नाही म्हटलं तरी आपल्या प्रकृतीकडे विनायकरावांचे दुर्लक्ष झाले होते. त्यांना हृदयविकाराचा आजार जडला होता. औषधपाणी चालू असतानाही विनायकरावांनी आपल्या समाजकार्यात खंड पडू दिला नव्हता.
३ सप्टेंबर १९६२. विनायकरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना काही आजाराने उस्मानिया इस्पितळात दाखल केले होते. त्या दिवशी विनायकरावांनी बराच काळ लक्ष्मीबाई बरोबर इस्पितळात काढला. दिवसभराचे सारे नित्यक्रम आटोपले. रात्री ९.३० ची वेळ. विनायकराव रात्रीच्या जेवणानंतर आपल्या जामबागच्या घरी दिवाणखान्यात आराम करत होते. तितक्यात बंगल्याच्या गेटमध्ये गडबड ऐकू आली. विनायकरावांच्या नोकराचा “वाचवा वाचवा” असा आवाज आला. विनायकराव गडबडीने उठले. बंगल्याच्या गेट कडे धावले. कोण चोर पळून जात असतांना नोकराने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. झटापटीत चोराने नोकरावर हल्ला केला होता. विनायकराव गेटपर्यंत पोहोचले तोपर्यंत चोर पळून गेला. परंतु वेळ आली होती. विनायकरावांच्या छातीत एकच कळ आली आणि विनायकराव खाली कोसळले.
एका महापुरुषाचा अंत झाला…