१७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शस्त्र खाली ठेवले आणि हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाल्याचे भारत सरकारने जाहीर केले. हैद्राबाद राज्यावर हंगामी लष्करी राजवट लागू केली गेली. ‘ऑपरेशन पोलो’ चे भारतीय सेनेचे प्रमुख मेजर जनरल जे. एन. चौधरी यांची हैद्राबाद राज्याचे  ‘मिलिटरी गव्हर्नर’ म्हणून नेमणूक करण्यात आली. शेवटचा निजाम, मीर उस्मान अली खान यांना भारताचा अविभाज्य अंग असलेल्या हैद्राबाद राज्याचा राज्यप्रमुख नेमण्यात आले. १९ सप्टेंबर १९४८ ते ३१ डिसेंबर १९४९ या कालखंडात हैद्राबाद राज्यावर जनरल चौधरी यांच्या अधिपत्याखाली लष्करी राजवट होती. 

वेलोदी सरकार 

२६ जानेवारी १९५० रोजी श्री. एम. के. वेलोदी यांची हैद्राबाद राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. श्री. वेलोदी मद्रास राज्यात 'इंडियन सिव्हिल सर्व्हिस' सेवेमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. श्री. वेलोदी यांना आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे अधिकार देण्यात आले. राज्याच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या नेत्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती व राज्याची प्रशासकीय घडी  बसविण्यासाठी  ज्या नेत्यांची नितांत आवश्यकता होती, अशा नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. सातवे निजाम उस्मान अली यांना ‘राजप्रमुख’ नेमण्यात आले. 

मंत्र्यांची नावे जाहीर होण्याआधी लोकांमध्ये विविध प्रकारचे अटकळ बांधले जात होते. त्यात विनायकरावांचे नाव मोठ्या आत्मविश्वासाने घेतले जात होते. अखेर श्री. वेलोदी यांनी पहिल्या चार मंत्र्यांची नावे जाहीर केली. त्यात विनायकरावांचे नाव आवर्जून होते. अर्थात विनायकरावांना याची भ्रांत नव्हती. विनायकराव आपल्या विधायक कामात मग्न होते. हितचिंतकांनी विनायकरावांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना गाठले तेंव्हाच विनायकरावांना या निर्णयाची माहिती मिळाली. विनायकरावांना कृषी व अन्नपुरवठा खाते देण्यात आले.  

विनायकराव यांशिवाय विनायकरावांबरोबरच  बी. रामकृष्ण राव,  मुलचंद गांधी, जैनयार जंग बहादुर, व्ही. बी. राजू, सी. व्ही. एस. राव, एम. शेषाद्री यांना यांनादेखील देखील मंत्रिपदासाठी पाचारण करण्यात आले. मुख्यमंत्री वेलोदी आणि सहा मंत्री असे सात जणांचे मंत्रिमंडळ कार्यरत झाले. वेलोदी सरकारच्या कालखंडात देखील निजाम उस्मान अली खान यांना ‘राजप्रमुख’ पदी नेमण्यात आले. श्री. वेलोदी यांचे सरकार दोन वर्षे अस्तित्वात होते. श्री. वेलोदी सरकारच्या काळात राज्यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. श्री. वेलोदी मंत्रिमंडळ  ६ मार्च १९५२ साली बरखास्त करण्यात आले. विनायकराव पूर्णवेळ या मंत्रिमंडळात होते. 

वेलोदी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर १९५० साली विनायकरावांनी हैद्राबाद आर्य प्रतिनिधीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सरकारमध्ये सामील झाल्यावर नैतिकदृष्ट्या आर्यसमाजाचे अध्यक्ष राहणे विनायक रावांना योग्य वाटले नाही. विनायकराव हैद्राबाद आर्य प्रतिनिधी सभेचे १९३३ सालापासून अध्यक्ष होते. आर्यसमाजापासून काही अंशी दूर होण्याचा निर्णय विनायकरावांसाठी खूपच अवघड होता. त्यांच्या दृष्टीने आर्यसमाज हे त्यांचे कुटुंब होते. विनायकरावांसाठी आणि तसेच सर्व आर्यसमाजी कार्यकर्त्यांसाठी हा अतिशय भावनिक क्षण होता. 

अर्थात मंत्रिपदात असतानादेखील त्यांचे आर्यसमाजाशी ऋणानुबंध कायम राहिले. १९५१ साली मेरठ येथे भरलेल्या अखिल भारतीय आर्यसमाज संमेलनासाठी विनायकरावांची  अध्यक्ष म्हणून निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला. 

बी. रामकृष्ण राव सरकार 

१९५२ साली हैद्राबाद राज्यात सर्वप्रथम विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. १७५ जागांपैकी ९३ जागा जिंकून कॉग्रेसचे सरकार बहुमताने निवडून आले. विनायकरावांनी उस्मानाबाद जिल्ह्यात लातूर शहरातून निवडणूक लढवली आणि बहुमताने निवडून आले. श्री. काशिनाथ वैद्यांची सभापतिपदी नियुक्ती करण्यात आली. बी. रामकृष्ण राव यांची मुख्यमंत्रीपदी निवडणूक झाली. श्री. दिगंबर बिंदू यांना गृह खाते देण्यात आले तर विनायकरावांना अर्थ, उद्योग आणि वाणिज्य खाते देण्यात आले.

याशिवाय के. व्ही. रंगा रेड्डी, श्री. मेलकोटे, नवाब मेहंदी नवाज जंग, श्री. फुलचंद गांधी, श्री. चेन्ना रेड्डी, श्री. गणमुखी, श्री. चांदेरगी, श्री. व्ही. बी. राजू, श्री. शंकर देव आणि श्री. देवीसिंग चौहान असे मिळून १३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. वेलोदी सरकारातील सातवे निजाम उस्मान अली यांचे ‘राजप्रमुख’ पद पुढे चालू ठेवण्यात आले. 

बी. रामकृष्ण राव यांच्या मंत्रिमंडळाने ६ मार्च १९५२ रोजी शपथ घेतली. हे सरकार संपूर्ण वेळ चालून ३१ ऑक्टोबर १९५६ रोजी संपुष्टात आले. विनायकरावांनी कॅबिनेट मंत्री म्हणून संपूर्ण वेळ कार्यभार सांभाळला. 

विनायकराव अन्न मंत्री 

१९५० ते ५२ या काळात वेलोदी सरकारात विनायकराव अन्न व पुरवठा मंत्री होते. दुर्दैवाने १९५० आणि १९५१ मध्ये राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. राज्यातील अन्नधान्य उत्पादन गरजेपेक्षा खूपच कमी झाले. राज्याची अन्न पुरवठा स्थिती अत्यंत खालावली होती. ग्रामीण भागातील लोक चिंचोके आणि तत्सम पदार्थ खाऊन दिवस काढत होते. वेलोदी सरकार हे हंगामी सरकार असल्याने अन्नधान्य आयात करण्याचे अधिकार राज्याकडे नव्हते. विनायकरावांनी वारंवार या चिंताजनक परिस्थितीकडे केंद्राचे लक्ष वेधले. परिस्थिती काबूत आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न विनायकरावांनी केले. 

त्यांनी राज्यातील जिल्ह्यांचा दौरा करून जनतेला वस्तुस्थिती सांगितली. राज्याकडून होत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. सरकारची असहाय्यता स्पष्ट केली.  विनायकरावांनी छोट्या छोट्या गावात जाऊन शेतकरी आणि गरिबांची अवस्था कशी आहे याची पाहणी केली. त्यांच्या व्यथा-वेदना, अडीअडचणी ऐकल्या आणि त्यांना शक्य ती मदत केली. याच दिवसात विनायकरावांनी बिदर जिल्ह्याचा दौरा केला. विनायकराव बिदर जिल्ह्यातील एका गावात पोहोचले. एका हरिजनांच्या झोपडीत गेले. झोपडीत एका कोपऱ्यात अन्न ठेवले होते. चिंचोक्या पासून बनवलेली चटणी आणि भाकरी हे त्या कुटुंबाचे जेवण होते. विनायकरावांनी त्या भाकरीचा लहानसा तुकडा घेतला आणि खाल्ला. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. जड अंत:करणाने विनायकराव झोपडीबाहेर आले. 

हैद्राबाद राज्यातून हरभरा व हरभरा डाळींचा राज्याबाहेर जाणारा माल बंद केला तर जनतेला मोठी मदत होईल हे विनायकरावांच्या लक्षात आले. परंतु ही बाब केंद्राची होती आणि केंद्र हे मानायला तयार नव्हते. शेवटी रावसाहेबांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून हरभरा व हरभरा डाळींची राज्याबाहेर जाणारी जावक बंद केली. परिणामी त्यांना केंद्राच्या रोषाला सामोरे जावे लागले. विनायकरावांची चाललेली पराकाष्ठा पाहून अनेक सधन व्यापारी, आर्यसमाजी इत्यादी पुढे आले. त्यांनी ठिकठिकाणाहून धान्य गोळा करून गरीबांमध्ये वाटले. 

अन्न आणि अन्न पुरवठा खात्याचे मंत्री असताना विनायकरावांचा आग्रह असे की आपल्या घराचे धान्य हे रेशन दुकानातूनच घ्यायचे. सगळ्यांनी खाल्लेला तोच जाड तांदूळ, लाल ज्वारी आणि गहू विनायकराव आपल्यासाठी विकत घेत. विनायकरावांना चांगला गहू आणि तांदूळ व्यापाऱ्यांकडून विकत घेणे सहज शक्य होते. परंतु घरातील लोकांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना विनयकरावांच्या सूचना होत्या,

“जे धान्य राज्यातील जनता खाते तेच धान्य मी आणि माझे कुटुंबीय खातील. तरच जनतेला होणारा त्रास आपल्याला समजेल.”

विनायकरावांची दिनचर्या 

मंत्री झाल्यानंतर रावसाहेब लवकरच शहरापासून साडेतीन मैलांवर असलेल्या बेगमपेठ येथील सरकारी बंगल्यात राहायला गेले. विनायकरावांना भेटण्यासाठी गावापासून ( एवढ्या दूर जाणे लोकांना अवघड जात असे. विनायकरावांच्या हे ध्यानी आले. कार्यालयातील काम आटोपले की विनायकराव आपल्या स्वतःच्या जामबागच्या घरी जात असत. विनायकरावांना भेटू इच्छिणारे त्यांना येथे भेटत. दोन - अडीच तास भेटीगाठी झाल्यानंतरच ते आपल्या मंत्र्याच्या निवासस्थानावर जात. दररोज शासकीय कार्यालये,  खाजगी, सरकारी बंगल्यांमध्ये भेटण्यासाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असे. भेटीगाठी संपल्यानंतर विनायकराव सरकारी फाईली पाहत. काम संपवून आराम करायला जाईपर्यंत विनायकरावांना रात्रीचे दोन अडीच वाजत. हा विनायकरावांचा रोजचा कार्यक्रम झाला होता. या सर्व गैरसोयींचा विचार करून लोकांना भेटण्याची वेळ निश्चित करण्याचा सल्ला विनायकरावांना त्यांच्या सचिव वर्गाने दिला. त्यावर विनायकराव म्हणाले,

“यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना भेटणेही जनतेला अवघड होते. आता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून येथे आलो आहोत, लोक आम्हाला भेटून त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आमच्या पुढे मांडतात. त्यांना मला भेटण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. यात खंड पडू देऊ नका.”

तरीदेखील सचिवांनी विनायकरावांच्या प्रेमापोटी त्यांच्या दालनाबाहेर ‘भेटीच्या वेळा’ याचा फलक लावला. दुसऱ्या दिवशी दालनात शिरतांना विनायकरावांनी तो पहिला. हसत हसत ते म्हणाले,

“दाराबाहेर फलक तर लटकवलात. पण येणाऱ्यांना अकारण लटकवू नका.”

भेटायला येणारे सगळेच प्रत्यक्ष काम घेऊन येत  नसत. त्यातले काही जण स्वतःचे घरगुती वाद घेऊन येत असत. कोणी वैयक्तिक सल्ला मागण्यासाठी येत असे. परंतु विनायकराव सगळ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत असत. विनायकराव म्हणत, 

“जेव्हा एखादा दुःखी माणूस येऊन आपले दु:ख आपल्यासमोर मांडतो आणि आपण त्याचे ऐकूनही घेत नाही, तेंव्हा त्त्याला अधिकच दुःख होते. त्याचे काम पूर्ण होवो अथवा न होवो, मंत्र्यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले  यातच ते सुखावतात.” 

कोणत्याही कार्यक्रमाला किंवा भेटींमध्ये विनायकराव वक्तशीरपणा काटेकोरपणे पाळत. सरकारी अधिकाऱ्यांना याची चांगली सवय झाली होती. त्यामुळे विनायकराव स्थळावर पोहोचण्याआधी सर्व अधिकारी पोहोचत आणि कार्यक्रमाचा बंदोबस्त ठेवत. विनायकराव आपल्या कर्मचाऱ्यांच्या चुका पोटात घालत. त्यांना समज देऊन चूक सुधारण्याची संधी देत. 

विनायकरावांचा साधेपणा 

मंत्री होण्या अगोदर किंवा नंतर देखील विनायकरावांचा स्वभाव अतिशय मनमोकळा होता. त्यात कृत्रिमतेचा  लवलेशही नसे. अतिशय साधे आणि खादीचे कपडे परिधान करणे विनायकराव पसंत करत. बरोबर शिपायाला घेऊन जाणे  त्यांना आवडत नसे. मोटारीवर ध्वज लावणे देखील त्यांना पसंत नव्हते. परंतु औपचारिकता म्हणून त्यांना हे सारे करावे लागे. विनायकरावांना एकदा त्यांच्या सचिवाने त्यांच्या वैयक्तिक गाडीवरही झेंडा लावण्याची परवानगी मागितली. तेंव्हा विनायकराव म्हणाले,

“कधीतरी माझ्या लहानशा गाडीत बसून मुक्तपणे फेरफटका मारण्याचा माझा आनंदही तुम्ही हिरावून घेताय. सरकारी गाडीवर झेंडा आहे तेच पुरे आहे”

मंत्री झाल्यानंतर सरकारी वातावरणात  रावसाहेबांना अनेक बंधने पाळावी लागत आणि औपचारिकतेकडे विशेष लक्ष द्यावे लागे. त्यांना महिनो-न-महिने मोकळेपणाने वागण्याची संधी मिळत नसे. जेंव्हा विनायकराव कामानिमित्त दिल्लीला जात तेंव्हा ‘कॅनॉट प्लेस’चा फेरफटका जरूर मारत. आणि जाताना लाल दिव्याची गाडी न घेता घोडागाडीने जात. विनायकराव म्हणत,

“मला इथे मंत्री म्हणून कोणी ओळखत नाही हे फार चांगले आहे. मला मोकळेपणाने हिंडता येते.”

१९५० मध्ये मंत्री झाल्यावर सुलतान बाजारमध्ये  विनायकराव एका कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गेले. कार्यक्रमाला दोन ते तीन तास लागतील या विचाराने विनायकरावांनी गाडी परत पाठवली आणि दोन तासाने परत येण्यास सांगितले. परंतु कार्यक्रम अपेक्षेपेक्षा बराच लवकर संपला. दिवाळीचे दिवस होते. आर्यसमाजाच्या काही कार्यकर्त्यांनी विनायकरावांना दिवाळीनिमित्त घरी आमंत्रण दिले होते. कार्यक्रमानंतर त्यांच्याकडे जाण्याचे आयोजन होते. कार्यक्रम संपल्यानंतर गाडी अजून आलेली नाही हे लक्षात येताच विनायकराव बरोबरच्या सचिवाला म्हणाले,

“चला चालत जाऊ. जागा इथून फार दूर नाही”

सचिवाच्या होकाराची वाट न बघता गर्दीतून वाट काढत, लांब पाऊले टाकत विनायकराव चालू लागले. बरोबरच्या अधिकाऱ्यांची आणि शिपायांची एकच तारांबळ उडाली. 

१९५१ मधली घटना. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी हैद्राबाद - सिकंदराबाद महापालिकेतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विनायकराव कार्यक्रमाच्या ठिकाणी आधीच येऊन पोहोचले. राष्ट्रपतींना यायला अजून अवकाश होता. विनायकरावांची जागा स्टेजवर होती. विनायकराव स्टेजवर चढू लागले तेवढ्यात त्यांची नजर समोरच्या रांगेत बसलेल्या त्यांच्या वकील मित्र आणि सहकाऱ्यांकडे गेली. विनायकराव थांबले आणि सहकाऱ्यांच्या बाजूला पहिल्या रांगेत बसले. सहकारी म्हणाले,

“विनायकराव, तुमची जागा वर स्टेजवर आहे.”

त्यावर विनायकराव गंमतीने  उत्तरले,

“स्टेजवरची जागा तात्पुरती आहे. मित्रांबरोबरची ही जागा कायमची आहे. राष्ट्रपती येईपर्यंत मला इथे बसण्याचा आनंद घेऊ दे.”

१९५४ ची घटना. हैद्राबाद  येथे अखिल भारतीय औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात आले होते. लहान मुलांचे खेळ आणि मनोरंजनाचीही व्यवस्था तेथे केली होती. मुलांसाठी घसरगुंडी आणि झोपाळ्याची  व्यवस्था केली होती. विनायकरावांच्या हस्ते त्या प्रदर्शनाचे उद्घाटन आयोजित केले होते. त्यात लहान मुलांच्या या विभागाचेही उद्घाटन होते. मोठे अधिकारी, स्त्री-पुरुष, मुले आणि शेकडो लोक उभे होते. रेशमी रिबन कापून उद्घाटन होणार होते. रिबन कापताना विनायकराव म्हणाले, 

"केवळ रिबन कापून हे उद्घाटन होणार  नाही." 

लोकांना काही समजण्याआधी विनायकराव घसरगुंडीवर चढले आणि पाहता पाहता घसरगुंडीवरून खाली सरकत आले. साठ वर्षाच्या मुलाला साऱ्या दर्शकांनी हसून आणि टाळ्या वाजवून दाद दिली. 

विनायकरावांची निरपेक्षता 

मंत्रीपदावर असताना विनायकरावांनी निरपेक्ष बुद्धीने काम केले. सरकारी कामातील गोपनीयता कायम राखली. निर्णय घेताना कधीही पक्षपात केला नाही. 

सरकारातील अनेक गोपनीय बाबी काही कारणांनी बाहेर पडतात आणि सामान्य चर्चेचा विषय बनतात. विनायकरावांच्या कार्यकाळात अनेक घडामोडी घडल्या, ज्या विनायकरावांनी सार्वजनिक होऊ दिल्या नाहीत. अगदी जवळच्या मित्रांना देखील ते राजकीय निर्णयांचा सुगावा लागू देत नसत. त्यामुळे कित्येकदा त्यांचे मित्र त्यांच्यावर नाराज होत. पण विनायकराव त्याकडे दुर्लक्ष करीत.

विनायकराव मंत्री झाल्यानंतर आर्यसमाजाच्या निकटवर्तीयांना वाटले की विनायकरावांकडून आपली वैयक्तिक कामे पूर्ण करून मिळतील. विनायकरावांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांवर अमाप प्रेम केले. परंतु जे अयोग्य आहे आणि ज्यात सरकारचे किंवा समाजाचे अहित आहे अशा कोणत्याही गोष्टींचे समर्थन केले नाही. याउलट विनायकराव आर्यसमाजाचे निष्ठावान आहेत तेंव्हा राज्यातल्या मुसलमानांचा ते दुःस्वास करतील असा कयास मुसलमान समाजातील काही वर्गाचा होता. परंतु विनायकरावांनी कोणाताही दुजाभाव न राखता मुसलमानांच्या मागण्यांना बरोबरीने न्याय दिला. मुसलमान समाज विनायकरावांकडे आदराने पाहू लागला. आपल्या अडीअडचणीत विनायकरावांकडे एक त्राता या दृष्टीने ते पाहू लागले. मुसलमान समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी जाहीररीत्या विधान केले,

“आम्ही विनायकरावांना प्रथम घाबरत होतो. परंतु त्यांच्यातील माणुसकी आणि त्यांचा संत स्वभाव याला तोड नाही.” 

सरकार दरबारी कित्येकवेळा आपल्या निकटवर्तीयांची कामे विनायकरावांना पूर्ण करता येत नसत. ती  कामे नियमाविरुद्ध किंवा इतरांना अहितकारी असल्यास विनायकराव ती कामे कटाक्षाने टाळत. परंतु समोरच्या माणसाची मानसिकता पाहून प्रकरण मोठ्या कौशल्याने हाताळत. 

एकदा त्यांच्या एका चांगल्या मित्राचे काम विनायकरावांनी करण्याचे नाकारले. त्यावर तो मित्र अतिशय नाराज झाला. “मी आता परत तुमच्याकडे कोणत्याही कामासाठी येणार नाही” असे सांगून तो निघून गेला. विनायकरावांनी आपला निर्णय बदलला नाही. परंतु तीन चार दिवसांनी आपल्या त्या मित्राच्या घरी स्वतःच चहापानाला गेले. विनायकराव घरी आलेले पाहून मित्राचा राग पार पळाला. 

याउलट एकदा एक ओळखीचा गृहस्थ विनायकरावांना भेटायला आला. त्याचे एक महत्वाचे काम सरकारात अडकले होते. काम नियमाविरुद्ध आहे म्हणून होणार नाही असे विनायकरावांनी पूर्वीच त्यांना सांगितले होते. परंतु गृहस्थ मानण्याच्या तयारीत नव्हता. गृहस्थ विनायकरावांना म्हणाला,

“विनायकराव, जर माझे काम झाले तर तुम्ही सांगाल त्या सामाजिक संस्थेला मोठे अनुदान देण्याची माझी तयारी आहे.”

समोरच्या व्यक्तीचे ते वक्तव्य ऐकून मात्र विनायकरावांचा पारा चढला. विनायकरावांचा चेहरा रागाने लाल झाला. परंतु प्रचंड संयमाने विनायकराव उद्गारले,

“तुम्ही येथून जाऊ शकता आणि परत मला भेटायची आवश्यकता नाही.” 

विनायकरावांचे रूप पाहून गृहस्थाची घाबरगुंडी उडाली. त्याने तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर त्याने कधीही विनायकरावांसमोर येण्याची हिंमत केली नाही. विनायकरावांनी देखील त्या गृहस्थाला कधीही संपर्क केला नाही. परंतु विनायकरावांना एक खंत कायम राहिली, 

“या गृहस्थाला माझा स्वभाव माहित असताना देखील मला समजण्यात त्याने एवढी मोठी चूक केली कशी?”

वक्तृत्व गुण 

विनायकरावांचे वक्तृत्व कौशल्य सर्वश्रुत होते. वक्तृत्व नैपुण्य विनायकरावांना त्यांच्या गुरुकुल काळापासून अवगत होते. गुरुकुल काळात विनायकराव वक्तृत्व कलागुणात अग्रेसर असत. सामाजिक सभा असो, राजकीय सभा असो अथवा विधानसभेतील प्रश्नोत्तरे असो. विनायकरावांच्या भाषणाची श्रोते आतुरतेने वाट बघत. विनायकराव संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, तेलगू, अशा अनेक भाषांत अस्खलित भाषण देत. अर्थात ते सहसा ते हिंदीतून बोलत आणि त्यांची हिंदीतली भाषणे अतिशय प्रभावी असत. विनायकरावांची भाषणे अतिशय मार्मिक असत परंतु हास्यरसाने नटलेली असत. त्यांची भाषणे श्रोत्यांच्या हास्याने आणि टाळ्यांनी भरून ओसंडत. 

हैद्राबाद राज्याच्या विधानसभेतील विनायकरावांची भाषणे आणि प्रश्नांची उत्तरे अतिशय समाधानकारक तसेच मनोरंजक आहेत. १९५३-५४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विनायकरावांनी  अर्थमंत्री या नात्याने जे भाषण केले आणि विरोधी पक्षाच्या हरकतींचे निराकरण केले ते इतके लक्षणीय होते की, राज्यातील वृत्तपत्रांनी त्याचे भरभरून कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत विनायकरावांना विधानसभेचे नेते म्हणून अनेकवेळा काम करावे लागले.  त्यावेळी विनायकरावांचे  वक्तृत्व आणि कार्यकुशलता वाखाणण्याजोगी होती.

भारतातील प्रसिद्ध संगीतकार श्री. औकारनाथ ठाकूर यांनी ऑक्टोबर १९५५ मध्ये हैद्राबादला भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये राज्याचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील प्रमुख लोक उपस्थित होते. श्री. ओंकारनाथांच्या परिचयाचा भार विनायकरावांवर टाकण्यात आला. विनायकरावांनी सुरुवात केली, 

“सूर्य उगवतोय, हे कुणाला सांगायची गरज नसते. परंतु तरी देखील कोंबडा आरवून सूर्योदयाची सूचना देतो. तसेच आज माझे झाले आहे. श्री. ओंकारनाथांची मी ओळख करून देणे म्हणजे कोंबड्याने आरवून सूर्योदयाची सूचना देण्यासारखे आहे”

विनायकरावांच्या त्या भाष्याने सभागृहात एकच हशा पिकला. 

राजकारण 

विनायकराव काँग्रेस पक्षातील गटबाजी पासून कायम दूर राहिले. विनायकरावांचे मंत्रिपदाचे स्थान हे त्यांची क्षमता आणि पात्रता यातून त्यांना मिळाले होते. ते कोणत्याही गटाचे किंवा व्यक्तीच्या मर्जीसाठी राजकारण करत नसत. जेंव्हा एखाद्या विषयात गट निर्माण झाले आणि जाहीररीत्या मत व्यक्त करावयाची वेळ विनायकरावांवर आली तर ते आपल्या स्वतंत्र विचाराने मुद्दे मांडत. त्यात कोणताही एक पक्ष घेत नसत. परंतु जनतेसमोर बोलताना ते पक्षाच्या निर्णयाच्या बाजूने बोलत. त्यांच्या बोलण्यात पक्षविरोधी सूर कधीही नसे. यावर ते म्हणत,

“प्रत्येक व्यक्तीने आपल्या संस्थेचे नियम पूर्णपणे पाळले पाहिजेत, अन्यथा संस्था निकामी होते.”

विनायकरावांचा आणखी महत्वाचा गुण म्हणजे त्यांचे विरोधी पक्षाशी असलेले सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध. सभागृहात विनायकराव विरोधकांवर आपल्या वक्तृत्व कौशल्याने मोठा हल्ला करत. त्यांचा विरोध मोठ्या कौशल्याने खोडून काढत. परंतु कधीही वैयक्तिक हल्ला करत नसत. विरोधकांचा सन्मान राखून त्यांच्याशी विवाद करत. 

१९५१ ची घटना. `विनायकराव काँग्रेस मंत्रिमंडळात होते. प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात ते सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. विनायकराव म्हणाले,

“देशातील कोणतीही व्यक्ती किंवा संस्था राष्ट्रहिताचे कोणतेही कार्य करत असेल किंवा राष्ट्रध्वज किंवा संविधानाचा सन्मान म्हणून कोणताही कार्यक्रम साजरा करत असेल, तर त्याच्याशी राजकीय मतभेद असले तरी अशा कामात आपण सहकार्य केले पाहिजे. मतभिन्नतेने सामाजिक शत्रुत्वाचे रूप घेऊ नये.”

यावर विनायकरावांवर काँग्रेसमध्ये अनेकांनी ताशेरे ओढले. परंतु तत्कालीन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री. दिगंबर बिंदू यांनी विनायकरावांची बाजू उचलून धरली.