३ वर्षे इंग्लंड मध्ये राहून आणि बॅरिस्टर डिग्री घेऊन १९२२ साली विनायकराव हैद्राबाद येथे परत आले. १४ वर्षे गुरुकुलात आणि ३ वर्षे इंग्लंडमध्ये राहून एका प्रदीर्घ काळानंतर विनायकराव आपल्या कुटुंबात कायमस्वरूपी राहायला आले होते. केशवराव आणि गीताबाई यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. १९०२ साली विनायकराव गुरुकुलात शिकण्यासाठी गेले तेंव्हा केशवराव आणि गीताबाई यांना दुसरे अपत्य झाले होते. त्याचे नाव विठ्ठल ठेवण्यात आले होते. विनायकने तान्ह्या विठ्ठलला पहिले होते. परंतु त्यापश्चात केशवराव - गीताबाईंच्या पोटी १९०३ मध्ये पुत्र आणि १९०५ साली कन्यारत्न जन्माला आले. मुलाचे नाव राम ठेवण्यात आले तर कन्येचे नाव गंगुबाई ठेवण्यात आले होते. विनायकरावांना आपल्या आई-वडील आणि भावंडांसोबत राहण्याचा योग अनेक वर्षानंतर येत होता. 

केशवराव 

विनायकराव कांगडी आणि इंग्लंड येथे शिकत असताना १९०२ ते १९२२ या काळात केशवरावांनी समाजकार्यात केलेले योगदान अतुलनीय होते. १८९८ साली केशवरावांनी आर्यसमाज, सुलतान बाजार शाखेचे सभासदत्व स्वीकारले. त्यानंतर केशवरावांनी आपल्याला स्वतःला आर्यसमाजास वाहून घेतले. हैद्राबाद राज्यात ‘आर्यसमाज म्हणजे केशवराव आणि केशवराव म्हणजे आर्यसमाज’ असे समीकरण झाले. हैद्राबाद राज्यात आर्यसमाजाला केशवरावांमुळे फार मोठी चालना मिळाली. राज्यात अनेक ठिकाणी आर्यसमाजाच्या शाखा स्थापन झाल्या. 

१९०७ साली केशवरावांनी श्री. वामनराव रामचंद्र नाईक यांच्या सहकार्याने ‘विवेक वर्धिनी’ नावाची शाळा स्थापन केली. विवेक वर्धिनी शाळेने देशप्रेमी पिढी घडवण्याचे फार मोठे काम केले. विवेक वर्धिनी शाळेचे थेटर आणि पटांगण म्हणजे हैदराबादमधील सांस्कृतिक  कार्यक्रमांचे  केंद्र बनले. १९०७ सालीच केशवरावांच्या प्रोत्साहनाने केशवरावांचे सहकारी श्री विठ्ठलराव देऊळगावकर आणि गिरिराव घाटे जहागीरदार यांनी गुलबर्गा येथे नूतन विद्यालयाची स्थापना केली. राज्यात स्वकीय शिक्षणाचे काम नूतन विद्यालयाने चोख बजावले. 

१९१८ साली केशवरावांनी श्री. वामनराव नाईक आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने राज्यात ‘हैद्राबाद सामाजिक परिषदेची’ स्थापना केली. समाजातील अनिष्ट चालीरीतींचे निर्मूलन करणे हे संस्थेचे मूळ उद्दिष्ट होते. १९२० साली केशवरावांच्या प्रोत्साहनाने श्री. लक्ष्मणराव फाटकांनी ‘निजाम विजय’ या वर्तमानपत्राची स्थापना केली. जनजागृतीचे मोठे काम निजाम विजयने केले. केशवरावांचा निजाम  विजयला कायम पाठिंबा असे. केशवरावांनी १९२२ साली श्री. ची. नी. जोशी यांच्या सहकार्याने ‘हैद्राबाद मराठी ग्रंथालया’ची स्थापना केली. प्रौढ शिक्षणात या ग्रंथालयाने मोलाची कामगिरी बजावली. 

केवळ समाजकार्यातच नव्हे तर केशवरावांनी त्यांच्या वकिली व्यवसायातही मोठी कामगिरी केली. निजाम राज्यात हिंदू समाजाला योग्य न्याय मिळावा यासाठी ते कायम झटले. अनेक नावाजलेले खटले चालवून त्यात योग्य न्याय मिळवून केशवराव एक प्रसिद्ध वकील म्हणून  नावाजले गेले. केशवरावांचे कायद्याचे ज्ञान जाणून निजाम सरकारने २० जून १९२२ रोजी त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशपदी केली. 

विनायकरावांना  केशवरावांबाबत  अतिशय आदर आणि प्रेम होते. केशवरावांच्या कर्तृत्वाबद्दल विनायकरावांना मोठा अभिमान होता. केशवराव विनायकरावांचे वडील तर होतेच परंतु विनायकरावांनी केशवरावांना गुरु मानले. केशवरावांच्या मार्गदर्शनाखाली विनायकरावांनी हैद्राबाद हायकोर्टात वकिली सुरू केली आणि  आणि स्वतःला समाजसेवेत झोकून दिले. 

केशवरावांच्या सामाजिक जीवनात विनायकराव सहभाग घेऊ लागले. आर्यसमाजाच्या सुलतान बाजार शाखेच्या वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊ लागले. प्लेगच्या साथीत केशवरावांच्या बरोबरीने समाजसेवा केली. शिक्षण प्रसार, अस्पृश्यता विरोधी प्रचार या केशवरावांच्या उपक्रमात आत्मीयतेने भाग घेतला. कामाच्या ओघात विनायकराव केशवरावांचे विचार आणि आचरण आत्मसात करत होते. 

विवाह 

सन १९२३. इंग्लंडला जाण्याआधीच गीताबाईंनी विनायकरावांकडे लग्नाचा विषय काढला होता. परंतु ‘बॅरिस्टर पदवी मिळाल्यानंतर बघू’ असे सांगून विनायकरावांनी विषय टाळला होता. विनायकराव परत आल्यानंतर मात्र गीताबाईंनी आग्रह धरला. केशवरावांनी  देखील मनावर घेतले आणि विनायकरावांचे दोनाचे चार हात झाले. वयाच्या २७ व्या वर्षी विनायकरावांचे अनुसुयाबाईंशी थाटामाटाने लग्न झाले. 

अनुसुया बाई या मूळच्या तांबे कुटुंबातल्या. तांबे कुटुंब हे मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंब होते. परंतु मुलीने शिकावे ही तांब्यांची मनापासून इच्छा होती. अनुसुया बाईंचे शिक्षण महर्षी कर्वेंच्या हिंगणे येथील महिला शाळेत झाले होते. लग्नानंतर त्यांचे नाव ‘लक्षमीबाई’ ठेवण्यात आले. 

त्याकाळी हुंडा पद्धत रूढ होती. लग्नात मुलीच्या वडिलांनी वरास संपत्ती भेट देण्याची प्रथा होती. एखादा मुलगा चांगला शिकलेला असेल किंवा त्याला चांगली नोकरी असेल तर हुंडा त्याप्रमाणे वाढत असे. ही प्रथा मुलीच्या वडिलांसाठी   जाचक असे. केशवराव अशा अनिष्ट पद्धतींच्या विरुद्ध होते. विनायकरावांच्या लग्नात त्यांनी हुंडा घेणे कटाक्षाने टाळले. ‘निजाम विजय’च्या अंकात याबाबत मुद्दाम बातमी छापून आली,

“केशवरावजी यांनी सनातन धर्म पद्धतीने चिरंजीव विद्यालंकार विनायकराव यांचा विवाह १२ मे सन १९२३ रोजी मोठ्या थाटाने साजरा केला.  लग्न समारंभास राजे, महाराजे, जहागीरदार, शेठ, सावकार, बडे अधिकारी हजर होते. केशवरावांनी हुंडा न स्वीकारता प्रौढ विवाह अमलात आणून लग्न समारंभ थोडक्यात कसा करावा याचा धडा घालून दिला आहे. वधू वर दीर्घायुष्यी होवोत असे आम्ही इच्छितो.”

आर्यसमाज 

आर्यसमाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापिलेला एक धार्मिक पंथ. आर्य समाजाची स्थापना १८७५ साली झाली होती. आर्य समाजाच्या मूलभूत कल्पनेप्रमाणे विश्वाचा निर्माता एक आहे आणि हिंदू धर्माची अचूक शिकवण केवळ वेद आणि उपनिषदात आहे. आर्य समाजाचा हिंदू धर्मातील पुराण ग्रंथांवर विश्वास नव्हता. 

श्री. भगवान स्वरूप (अजमेर) आणि श्री. गोकुळ प्रसाद यांच्या प्रयत्नांमुळे हैद्राबाद संस्थानात घारूर, जिल्हा बीड येथे पहिल्या आर्यसमाज शाखेची स्थापना झाली. त्यापाठोपाठ १८९२ मध्ये हैद्राबाद शहरातील सुलतान बाजार परिसरात आर्यसमाजाच्या हैद्राबाद शहर शाखेची स्थापना झाली. १८९८ मध्ये केशवरावांनी आर्यसमाजाच्या सुलतान बाजार शाखेचे सदस्यत्व घेतले. केशवरावांनी हैद्राबाद संस्थानातील आर्यसमाजात एक नवीन चैतन्य निर्माण केले. संस्थानात अनेक ठिकाणी आर्यसमाजाच्या शाखा सुरू झाल्या. 

१९२२ मध्ये इंग्लंडहून परत आल्यानंतर विनायकरावांनी  आर्यसमाजाच्या कार्यात सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. स्वामी श्रद्धानंदांच्या देखरेखीखाली तयार झालेल्या  विनायकरावांनी हैद्राबाद आर्यसमाजात लवकरच जम बसवला. त्यांच्या अस्खलित भाषण शैलीने विनायकराव सहज सभा जिंकत. अनेक वर्षे कांगडी येथे राहिले असल्याने ते सहसा हिंदीतूनच आपली भाषणे करीत. एक सर्वमान्य नेता या नात्याने ते लवकरच लोकप्रिय झाले. 

२३ डिसेंबर १९२६ रोजी एका माथेफिरू इसमाने स्वामी श्रध्दानंदांची हत्त्या केली. केवळ आर्य समाजच नव्हे तर सारा देश हळहळला. देशभर शोकसभा घेण्यात आल्या. हैद्राबाद आर्यसमाजात देखील प्रेम थेटर येथे प्रचंड मोठी शोकसभा नियोजित केली होती. अनेक मान्यवरांनी सभेत शोकपर भाषणे केली. विनायकराव जेंव्हा भाषणासाठी उभे राहिले तेंव्हा त्या प्रचंड जनसमुदायाने “स्वामीजी अमर रहे” च्या घोषणा देत विनायकरावांचे स्वागत केले. विनायकरावांनी सभेत अतिशय भावुक भाषण केले. विनायकराव भाषणात म्हणाले,

“मी स्वामीजींच्या सानिध्यात १४ वर्षे काढली आहेत. स्वामीजींचे अंतःकरण किती थोर होते हे इतरांस कळणे शक्य नाही. स्वामीजी अनेक रोगांशी आज काही वर्षे झगडत होते व त्यांच्यावर इतरही अनेक संकटे आली होती. परंतु त्यात त्यांचे देहावसान झाले नाही. ते आज अशा रीतीने झाले. त्यांनी स्वीकारलेले कार्य पुरे करण्याकरिता ते पुन्हा येथे अवतरतील ही खात्री बाळगा व त्यांच्या आगमनार्थ आवश्यक ती तयारी करा.”

जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

१८९२ ते १९३० या काळात केशवरावांच्या नेतृत्वाखाली सुलतान बाजार शाखेने संस्थानात फार मोठे कार्य करून संस्थानातील सर्व शाखांत आघाडीचे स्थान प्राप्त केले होते. परंतु संस्थेला सांघिक स्वरूप यावे यासाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापन करणे आवश्यक होते. १९३१ साली महात्मा नारायण स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शाखांची एक   बैठक झाली. जमलेल्या सर्व प्रतिनिधींनी ‘हैद्राबाद आर्य प्रतिनिधी सभे’च्या स्थापनेची घोषणा केली. श्री. केशवराव कोरटकर यांना मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष निवडण्यात आले तर श्री. चंदुलाल यांची मंत्री म्हणून निवड करण्यात आली. विनायकरावांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 

केशवरावांचे निधन 

केशवराव न्यायमूर्ती असतानाच त्यांना १९२५ मध्ये मधुमेहाचा विकार जडला होता. त्यांचा  हा विकार पुढे जास्त बळावला. त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला आणि फार कमी दिसू लागले. केशवरावांनी मुंबईला जाऊन डोळ्यांचा इलाज करावा यासाठी विनायकरावांनी आग्रह धरला. केशवरावांनी  ते मान्य केले. 

विनायकराव मार्च १९३२ मध्ये केशवरावांना घेऊन मुंबई येथे आले. केशवरावांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. ऑपरेशन झाल्यानंतर ते पुण्यात येऊन राहिले. केशवरावांचे परममित्र राघवेंद्रराव शर्मा पुण्यातच राहत असत. विनायकरावांनी केशवरावांना राघवेंद्रराव यांच्या देखरेखीखाली पुण्यात विश्रांतीसाठी ठेवले. २० मे  रोजी केशवराव मधुमेहामुळे कोमात गेले. २१ मे १९३२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा पुणे येथे अंत झाला.

विनायकरावांना २१ तारखेला तार आली. परंतु ती मिळेपर्यंत मुंबईकडे जाणारी रेल्वे निघून गेली होती. त्यामुळे मोटारीने निघून ते दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता पुण्यात पोहोचले. सायंकाळी पाच वाजता  केशवरावांची अंत्ययात्रा निघाली.

केशवरावांच्या निधनाचे विनायकरावांना अतोनात दुःख झाले. केशवराव त्यांचे वडीलच नव्हते तर त्यांचे व्यवसायातील आणि सामाजिक कार्यातील गुरु होते. केशवरावांनी सुरु केलेल्या समाजकार्याचे ते उत्तराधिकारी होते. केशवरावांच्या मृत्यूसमयी विनायकरावांचे वय जेमतेम ३७ वर्षांचे होते. परंतु खचून न जाता केशवरावांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विनायकरावांनी कंबर कसली. सामाजिक कार्यात तर त्यांनी खंबीर पावले उचललीच परंतु सर्वात मोठा मुलगा या नात्याने केशवरावांच्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.