स्वामी दयानंद सरस्वतींनी १८७५ मध्ये आर्यसमाजाची स्थापना केली आणि त्यानंतर आर्यसमाजाला तत्कालीन समाजात फार मोठे समर्थन मिळाले. राष्ट्राच्या सामाजिक आणि राष्ट्रीय जागृतीत आर्य समाजाला  फार मोठे स्थान मिळाले. परंतु स्वामी दयानंदांच्या पश्चात आर्यसमाजात तात्विक विचारांवरून दोन गट पडले. ‘पुरोगामी’ आणि ‘सनातनी’ हे ते दोन गट. पुरोगामी गटाचा पाश्चात्य शिक्षण पद्धतीवर विश्वास, तर सनातनी गटाचा आपल्या संस्कृतीस अनुसरून  वैदिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले गेले पाहिजे हा आग्रह. 

साल १९०२. सनातनी प्रवाहाचे नेतृत्व त्याकाळी स्वामी श्रद्धानंद करत असत. स्वामी श्रद्धानंद हे दयानंद सरस्वती यांचे पट्टशिष्य आणि सनातनी प्रवाहाचे आद्य समर्थक होते. स्वामी श्रद्धानंदांनी हरिद्वार जवळ कांगडी या ठिकाणी एका भव्य गुरुकुलाची स्थापना केली. या गुरुकुलामध्ये ६ ते ८ वर्षातील वयोगटाच्या हुशार विद्यार्थ्यांना दाखला देऊन त्यांना १४ वर्षे वैदिक पद्धतीने शिक्षण दिले जाई. मुलांना शास्त्र, गणित या शिवाय संस्कृत, इंग्रजी, हिंदी आदी भाषांचे शिक्षण दिले जाई. शिक्षण १४ वर्षे चाले व मुलांना प्रलोभनांपासून दूर ठेवण्यासाठी या काळात आपल्या घरी जाता येत नसे. इतकेच नाही तर पालकांना आपल्या मुलांना वर्षातून केवळ एकदाच भेटण्याची मुभा असे. 

गुरुकुलाचा निधी गोळा करण्यासाठी स्वामीजी राष्ट्रव्यापी दौऱ्यावर होते. याचाच एक भाग या नात्याने स्वामीजी हैद्राबाद येथे आले होते. स्वामीजींनी केशवराव, कुंवर बहादुर आणि गोविंद सिंह या तिघा आर्यसमाजींची  भेट घेतली. स्वामीजींनी विषयाला सुरुवात केली,

“कांगडी येथील गुरुकुलाच्या बांधकामाचं काम जोरात चालू आहे. यासाठी आपल्याला निधीची नितांत आवश्यकता आहे. हैद्राबाद संस्थानातून निधी गोळा करण्याचं काम तुम्ही करावं ही माझी इच्छा आहे.”

तिघांनी स्वामीजींची मागणी ताबडतोब मान्य केली. स्वामीजींच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.  स्वामीजींनी आणखी एक मागणी पुढे केली. ते  म्हणाले, 

“तुम्हा तिघांनी आपल्या पुत्रांना गुरुकुलात शिकण्यासाठी पाठवावे ही माझी विनंती आहे. गुरुकुलाला  योग्य विद्यार्थी हवेत .”

स्वामीजींची दुसरी विनंती ऐकून साऱ्यांच्या पोटात गोळा आला. केशवरावांचे विनायक वर अतोनात प्रेम होते. विनायकला १४ वर्षे आपल्यापासून दूर ठेवण्याची कल्पना देखील केशवरावांना करता येत नव्हती. त्यातून गीताबाईंची या प्रस्तावाला मंजुरी मिळणे कदापि शक्य नव्हते. दुसऱ्या बाजूला रावसाहेबांची गुरुकुल शिक्षण पद्धतीवर अतोनात श्रद्धा होती. गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची पात्रता इतर कोणत्याही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असेल यावर रावसाहेबांचा दृढ विश्वास होता. सर्वतोपरी विचार केल्यानंतर रावसाहेब विनायकला कांगडीला पाठविण्याच्या निर्णयास पोहोचले. 

प्रश्न गीताबाईंना कसे समजवावे हा होता. गीताबाईंना  हा प्रस्ताव कधीच मंजूर होणार नव्हता. केशवरावांनी प्रथम विनायकला एकांतात बोलावले. त्याला कांगडी  गुरुकुलाबाबत माहिती देऊन त्याची इच्छा जाणून घेतली.   विनायक जेमतेम आठ वर्षांचा होता. या साऱ्याचा  खोलवर विचार करण्याचे त्याचे वय नव्हते. परंतु वडिलांवर त्याचे नितांत प्रेम होते आणि त्यांच्याबद्दल आदर होता. ‘वडील जे काही करतील ते निश्चितच आपल्या हिताचं असणार’ हा गाढ विश्वास विनायकला होता. विनायकने गुरुकुलात प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. 

रावसाहेबांना गीताबाईंपुढे हा विषय काढण्याचा धीर होत नव्हता. त्यांनी विनायकला गुलबर्ग्याला घेऊन जातो असे सांगून घरून नेले. इकडे कुंवर बहाद्दूर आणि गोविंद सिंह  यांनी देखील आपल्या मुलांना कांगडी येथे गुरुकुलात पाठवण्याचा निर्णय घेतला. तिन्ही मुलांना १४ वर्षासाठी कांगडी गुरुकुलात दाखल करण्यात आले. परत आल्यानंतर गीताबाईंना केशवरावांनी सत्य सांगितले. गीताबाईंच्या दुःखाला पारावार उरला नाही. केशवरावांनी गीताबाईंची क्षमा मागितली परंतु गुरुकुलाचे फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. वर्षातून एकदा विनायकला भेटता येईल या आशेवर गीताबाईंनी हे अखेर मान्य केले. गीताबाईंनी वरकरणी हे सारे मान्य केले असले तरी त्यांना या प्रकरणाचं दुःख पचवायला बराच काळ लागला. 

गुरुकुल 

केशवराव विनायकला घेऊन कांगडी येथील गुरुकुलात आले. विनायकला स्वामी श्रद्धानंदांच्या हवाली करून जड पावलांनी हैद्राबादला परतले. कोरटकरांच्या घरात लाडाने वाढलेल्या विनायकसाठी हे एक नवे विश्व होते.  हैद्राबादपासून १८०० किलोमीटर दूर, तीर्थक्षेत्र हरिद्वारपासून ६ किलोमीटर अंतरावर गंगेच्या तीरावर विस्तीर्ण जागेवर कांगडी गुरुकुल वसले होते. गुरुकुलाच्या  उत्तरेला आणि पूर्वेला हिमालयाच्या गगनचुंबी पर्वतरांगा तर पश्चिमेला पवित्र गंगा वाहत होती. गुरुकुलाच्या सभोवताली घनदाट अरण्य होते. अशा या रम्य जागी विनायकने गुरुकुल शिक्षणाचा आरंभ केला. गुरुकुलात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्वाची साधने उपलब्ध होती. संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी विषयातील ८०,००० पुस्तके उपलब्ध होती. विद्यार्थ्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्थित सोय असली तरी त्यात अत्यंत साधेपणा होता. सर्व कामे विद्यार्थ्यांना स्वतःहून करावी लागत. 

वैदिक काळापासून हिंदू संस्कृतीत गुरुकुल शिक्षण पद्धती प्रचलित होती. गुरुकुल हा शब्द दोन शब्दांचे संयोजन आहे, ‘गुरु’ म्हणजे शिक्षक आणि ‘कुल’ म्हणजे कुटुंब किंवा घर. गुरुकुल पद्धतीत शिक्षण घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरूच्या घरी वास्तव्य करतो आणि गुरूच्या कुटुंबाचा एक भाग बनतो. घराची सर्व कामे तो एखाद्या घरच्या माणसाप्रमाणे करतो.

कांगडी येथील गुरुकुल शिक्षण पद्धतीत केवळ वेद आणि उपनिषदेच शिकवली जात नसत तर त्यांना गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, हिंदी आणि इतर भाषांचे सखोल ज्ञान दिले जात असे. शिष्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जात असे. वक्तृत्व, गायन, नृत्य, हस्तकला, ​​खेळ, आणि योग यासारख्या कौशल्यांवर भर दिला जात असे. 

विनायक लवकरच गुरुकुलाच्या वातावरणात रुळला. विज्ञान आणि गणितात तो विशेष रस घेऊ लागला. संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश भाषा तो अस्खलित बोलू व लिहू लागला. विनायक खेळात अग्रेसर असे. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट आणि जलतरण हे त्याचे आवडते खेळ होते. वक्तृत्व स्पर्धा, सांघिक  चर्चासत्र यात विनायक निपुण होता. विनायक कोणाशीही सहज मैत्री करीत असे आणि मित्राचा संपूर्ण विश्वास  मिळवीत असे. विनायकाचे नेतृत्व गुण विशेष दिसून येत होते. 

गुरुकुलात अभ्यासाची जशी सर्व साधने उपलब्ध होती तशी खेळाची साधने देखील उपलब्ध होती. काही विद्यार्थी पुस्तक वाचन आणि अभ्यास यात सदोदित मग्न असत. त्यांना आपल्या शारीरिक स्वास्थ्याची शुद्धही नसे. तर काही विद्यार्थी फक्त खेळात रुची दाखवत. परीक्षा जवळ आली तरी हे विद्यार्थी खेळांत दंग असत. परंतु विनायकमध्ये या दोघांचा समन्वय साधण्याची क्षमता होती. 

विज्ञानाची आवड 

एकदा गुरुकुलात रसायनशास्त्राच्या प्रयोगांची वार्षिक परीक्षा चालू होती.  विनायकचा रसायनशास्त्र हा आवडीचा विषय होता. परीक्षेत दिलेल्या अनेक प्रयोगापैकी एक प्रयोग एक विशिष्ट प्रकारचे ‘क्षार’ बनविण्याचा होता. विनायकने  इतर प्रयोग सोडून हा प्रयोग हातात घेतला. विनायक काय करत आहे याकडे परीक्षकांचे बारकाईने लक्ष होते. विनायकने प्रक्रिया योग्य तऱ्हेने पूर्ण केली परंतु ते क्षार तयार होत नव्हते.  विनायकने इतर प्रयोगांना हात न लावता हाच प्रयोग पुन्हा  पुन्हा करून पाहिला. विनायकने उत्तर पत्रिकेवर एकच वाक्य लिहून उत्तरपत्रिका परीक्षकांच्या हातात दिली.

एकंदर प्रकार बघून सर्वांना असे वाटले की विनायक या परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही.  परंतु झाले उलटे.  परीक्षकाने विनायकला सर्वात जास्त गुण दिले. विनायक ने उत्तरपत्रिकेत लिहिले होते, 

“क्षार बनवण्याची प्रक्रिया योग्य आहे परंतु हवामान व भौतिक परिस्थितीमुळे बनलेल्या क्षाराचे पुन्हा बाष्पीभवन होते.”

इतर विद्यार्थ्यांनी विनायकला सर्वात जास्त गुण कसे मिळाले असे विचारले असता परीक्षकांनी सांगितले, 

“मी हा प्रयोग स्वतः करून पाहिला आणि विनायकचे उत्तर बरोबर आहे. क्षार तयार होते परंतु त्याचे विशिष्ट हवामानामुळे परत बाष्पीभवन होते. विनायकला मी जास्त गुण दिले ते त्याने काढलेला तर्क बघून आणि त्याने दाखवलेल्या चिकाटीला .” 

वक्तृत्व कौशल्य 

त्याकाळी श्रीनिवास शास्त्री नावाचे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ होते. शास्त्रीजींचा विश्वास होता की भारतीय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून दिले जावे. विज्ञान तसेच आंतरराष्ट्रीय विषय विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी भाषेतूनच चांगले अभ्यासता येतील. याविषयावर गुरुकुलातील आचार्य रामाचार्य यांच्याबरोबर त्यांचा कायम वाद असे. ते म्हणत,

“आचार्य, मी आपल्या गुरुकुलाचा आदर करतो. गुरुकुलातील विद्यार्थी संस्कृत आणि हिंदी भाषेत निश्चितच चांगली कामगिरी करतील. हिंदू संस्कृतीचा अभ्यास ते उत्तम रीतीने पार पाडतील. परंतु आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये आणि बदलत्या जगाशी जमवून घेण्यात ते मागे पडतील.” 

यावर आचार्यांनी शास्त्रीजींना ठणकावून सांगितले,

“गुरुकुलातील विद्यार्थी संस्कृत आणि हिंदी भाषेत निपुण तर आहेतच, परंतु त्यांना इंग्रजीचे ज्ञानही दिले जाते. आंतरराष्ट्रीय विषयांवर त्यांचे ज्ञान कमी लेखता येणार नाही. आपल्याला जर परीक्षा घ्यावयाची असेल तर माझी तयारी आहे.”

शास्त्रीजींनी हे आव्हान मान्य केले. शास्त्रीजी आचार्यांना म्हणाले, 

“हे मला मान्य आहे. तुम्ही सांगाल तेव्हा मी गुरुकुलाला भेट देईन. तुम्ही विद्यार्थी निवडा. मी विषय देईन. विद्यार्थी विषयाचा अभ्यास करून सभेपुढे आपली मते मांडेल.”

आचार्यांनी मान्य केले. दिवस ठरला. श्रीनिवास शास्त्री यांनी गुरुकुलाला भेट दिली. शास्त्रीजींनी विषय दिला, “दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या समस्या”. आचार्य रामाचार्य यांनी आपला विद्यार्थी निवडला. तो होता विनायक. विनायकने दिलेल्या विषयाचा अभ्यास केला आणि सभेला संबोधण्यासाठी मोठ्या आत्मविश्वासाने उभा राहिला. पाहता पाहता त्याने सभा जिंकली. विनायकची विषयावरची पकड आणि वक्तृत्व कौशल्य पाहून शास्त्रीजी आश्चर्याने थक्क झाले. त्यांनी विनायकच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 

नम्रता 

सालाबाद प्रमाणे एके वर्षी गुरुकुलात वार्षिक उत्सव साजरा होत होता. सर्व विद्यार्थ्यांना या उत्सवाचे मोठे आकर्षण असे. या वर्षी विनायकाच्या वर्गाने एक नियतकालिक प्रकाशित करण्याचे ठरवले. नियतकालिक  छापण्यासाठी सर्व वर्गाने स्वामी श्रध्दानंदांकडे एका ‘डुप्लिकेटर’ची मागणी केली. त्याप्रमाणे स्वामीजींनी एक डुप्लिकेटर आणला देखील. परंतु त्याचा ताबा त्यांच्या स्पर्धक वर्गाने घेतला आणि त्यांनी तो लपवून ठेवला. उत्सव तोंडावर आला होता. उत्सवाला चार-पाच दिवस बाकी होते. वर्ग हतबल झाला होता की आता करायचे काय?  विनायकने आव्हान मंजूर केले. तीन  रात्री जागून त्याने मासिकाचे हस्तलिखित तयार केले. नियतकालिक तयार झालेले पाहून साऱ्या वर्गाच्या आनंदाला  पारावार उरला नाही. मित्रांनी विनायकचे नाव संपादकाच्या जागी लिहिण्याचा प्रस्ताव मंडला. विनायकने त्याला साफ नकार दिला. विनायकने निक्षून सांगितले, 

“मी हे सारे आपल्या वर्गासाठी केले आहे. त्यात स्वतःला काही महत्व मिळावे हा हेतू नव्हता. तेंव्हा मला हे आवडणार नाही.” 

अखेर साऱ्यांना विनायकचे म्हणणे मान्य करावे लागले. 

नेतृत्व गुण 

गुरुकुलातील मुले नेतृत्व गुणात निपुण असावीत असा आचार्य श्री. रामाचार्य यांचा नेहमीच प्रयास असे. यासाठी आचार्यांनी एक उत्तम उपक्रम राबवला. पार्लमेंट मध्ये प्रस्तावित केलेल्या बिलावर चर्चा होऊन निर्णय घेतला जातो. त्या धर्तीवर एक ‘मॉक पार्लमेंट’ तयार करून विद्यार्थ्यांना चर्चेची तयारी करायला सांगितली. विनायकची नेतृत्व निपुणता आचार्यांना चांगली माहिती होती. त्यांनी विनायकला प्रधानमंत्री केले. विनायकने आपले मंत्रिमंडळ  बनविले. त्यांचे प्रतिस्पर्धी जयचंद याला विरोधी पक्ष नेते नियुक्त करण्यात आले. जयचंदने आपला विरोधी पक्ष तयार केला. “प्राथमिक शिक्षण अनिवार्य असावे” असा विषय  ठरविण्यात आला. दोन्ही पक्षांनी आपापली मते मांडण्यास सुरुवात केली. विषयावर प्रश्न-उत्तराचा काळ देण्यात आला. त्यात अनेक वाद विवाद झाले. विनायकने आपल्या वक्तृत्व चातुर्याने सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय समाधानकारक दिली. अखेर सत्ताधारी पक्षाचा विजय झाला आणि बिल पास करण्यात आले. विनायकच्या नेतृत्व गुणांवर आचार्य तसेच गुरुकुलमधील सर्व विद्यार्थी खुश झाले. 

गुरुकुलात ‘लंका विजय’ नावाचा एक खेळ खेळला जात असे. त्यात विद्यार्थ्यांचे दोन गट केले जात. दोन्ही गटांना आपापला ध्वज दिला जाई. हा खेळ साधारणतः ५ ते ६ तास चाले. या काळादरम्यान दोन्ही गट प्रतिद्वंद्वी गटाचा झेंडा हस्तगत करण्याचा प्रयत्न करत. तसेच दोन्ही गट खजिन्याच्या रूपात मिठाईचा डब्बा लपवून ठेवत. प्रतिद्वंद्वी गटाला तो शोधून हस्तगत करावा लागे. विनायक सहसा या खेळात एका गटाचा कर्णधार असे. प्रत्यक्ष द्वंद्व करण्यापेक्षा बौद्धिक धोरण अवलंबण्याकडे विनायकचा कल  असे. आपल्या गटाला एकत्र करून विजयाकडे वाटचाल करण्यात विनायक निपुण होता. 

क्रीडा निपुणता 

वाचन, अभ्यास, वक्तृत्व यात विनायक जितका समरस होई तितकाच तो क्रीडा क्षेत्रात देखील पारंगत होता. फुटबॉल खेळात विनायकची विशेष निपुणता होती. अनेक वर्षे विनायक विश्वविद्यालयाच्या संघाचा कर्णधार होता. हॉकी खेळातही विनायक संघात ‘सेंटर फॉरवर्ड’ म्हणून खेळत असे. क्रिकेट खेळात गुगली गोलंदाज म्हणून विनायकाची ख्याती होती. जलतरण कलेत विनायक निपुण होता. गुरुकुलाच्या शेजारी वाहणाऱ्या गंगेच्या विशाल प्रवाहात विनायक सहज लीलया पोहत असे.

विद्यालंकार 

१९१९ मध्ये विनायकला गुरुकुल कांगडी येथे ‘विद्यालंकार’ ही पदवी मिळाली. विनायकच्या भावी आयुष्यात गुरुकुल येथे शिक्षण घेऊन ‘विद्यालंकार’ पदवी मिळवण्याचा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला. ‘विद्यालंकार’ ही केवळ शैक्षणिक पदवी नव्हती. देशसेवा आणि समाजसेवेचे ते मानचिन्ह होते.  भारतीय संस्कृतीचे ज्ञान-भंडार किती समृद्ध आहे याची प्रचिती विनायकला या पदवीमुळे आली होती.