१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु भारताच्या नकाशाच्या मधोमध २.१४ लाख चौरस किलोमीटरचा हैद्राबाद संस्थानाचा विस्तीर्ण भूभाग अजूनही आझाद  झाला नव्हता. आजच्या महाराष्ट्रातील मराठवाड्याचा संपूर्ण भूभाग हैद्राबाद संस्थानचा एक भाग होता. हैद्राबाद संस्थानावर निजाम घराण्याचा सातवा निजाम, मीर उस्मान अली खान राज्य करत होता. त्याने भारतात विलीन होण्याचे नाकारले आणि स्वतंत्र हैद्राबाद राज्य घोषित केले. जोपर्यंत हैद्राबाद राज्य स्वतंत्र भारतात विलीन होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने अखंड भारताची स्थापना होणार नव्हती. 

निजामाबरोबर अनेक बोलणी असफल झाल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन पोलो’ ही पोलीस कारवाई केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली १३ सप्टेंबर १९४८ रोजी ही कारवाई सुरु झाली. हैद्राबाद संस्थानावर चालून येणाऱ्या भारतीय दलाचा प्रतिकार रझाकार या निजाम धार्जिण्या संघटनेने केला, परंतु बहुतांश जनतेने त्यांचे स्वागतच केले. अवघ्या चार दिवसात निजामाने शरणागती पत्करली आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाल्याची घोषणा करण्यात आली.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या पोलीस कारवाईद्वारे संस्थान बरखास्त करण्यात आले असले तरी त्यात स्थानिक जनतेचा आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचा फार मोठा वाटा आहे. सरदार पटेल यांचे नेतृत्व निर्विवाद आहे परंतु हैद्राबाद संस्थानातील जनतेने दिलेला लढा आणि त्यांचे सर्वतोपरी सहकार्य याशिवाय हे यश सहज शक्य नव्हते हेही तितकेच खरे आहे. हैद्राबादच्या लढ्यात मराठी जनता आणि नेते कायम अग्रेसर होते याला इतिहास साक्ष आहे. परंतु हैद्राबाद संस्थानाचे स्वतंत्र भारतात झालेले विलीनीकरण आणि त्यानंतरचे त्रिभाजन या प्रक्रियेत मराठी नेत्यांचे हे योगदान काळाच्या पडद्याआड गेले आहे. हा इतिहास आणि या कार्यकुशल नेत्यांचे योगदान नवीन पिढीपुढे येणे अत्यंत आवश्यक आहे. 

विनायकराव विद्यालंकार हे असेच एक हैद्राबाद राज्याचे झुंजार मराठी नेतृत्व होते. १९३३ ते १९५० या निर्णायक काळात विनायकरावांनी हैद्राबाद आर्यसमाजाचे एकहाती नेतृत्व केले. हैद्राबाद संस्थानाच्या स्वातंत्र्य लढ्यात आर्यसमाजाचे योगदान अतुलनीय आहे. विनयकरावांचा निजामाविरुद्ध लढा आणि त्यांनी भारत सरकारशी केलेले सहकार्य याचा ‘ऑपेरेशन पोलो’ च्या यशात फार मोठा वाटा  आहे. 

विनायकरावांचा जन्म न्यायमूर्ती केशवराव कोरटकर या हैद्राबाद संस्थानाच्या थोर समाजसेवकाच्या घरी झाला. केशवराव मूळचे कोरटे या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील एका लहानश्या गावचे. शिक्षणानंतर केशवरावांनी हैद्राबाद येथे स्थलांतर केले. न्या. केशवराव यांचे शिक्षण प्रसार, जातीवाद विरोध, स्त्री हक्क प्रस्थापना इत्यादी विषयातील काम फार मोलाचे आहे. स्वतः न्या. केशवराव आर्यसमाजी होते आणि १९३२ पर्यंत हैद्राबाद आर्यसमाजाचे अध्यक्ष होते. 

विनायकराव कोरटकर यांचे शिक्षण आर्यसमाजाच्या कालडी येथील गुरुकुलात झाले. गुरुकुलात त्यांनी ‘विद्यालंकार’ पदवी घेऊन पुढे इंग्लंड येथे बॅरिस्टर पदवी घेतली. शिक्षण पूर्ण करून विनायकरावांनी संपूर्ण वेळ हैद्राबाद आर्यसमाजासाठी काम केले. ते पुढे हैद्राबाद काँग्रेसचे सभासद देखील झाले. विनयकरावांच्या ‘विद्यालंकार’ या पदवीने ते ‘विनायकराव कोरटकर’ चे ‘विनायकराव विद्यालंकार’ म्हणून ओळखले जाऊ लागले. 

१९३८ ते १९४८ हे दशक हैद्राबाद राज्याच्या स्वातंत्र्यात फार महत्वाचे समजले जाते. विनायकरावांनी या काळात आर्य समाज, हैद्राबाद काँग्रेस आणि ‘वकील समिती’ या संस्थांतून कार्य करून हैद्राबादच्या स्वातंत्र्यात मोलाची कामगिरी बजावली. १९३९ च्या आर्यसमाज सत्याग्रहात विनायकरावांचे नेतृत्व निजाम सरकारच्या अहंकाराला खिंडार पाडण्यास कारणीभूत ठरले. वकील समितीचे अध्यक्ष या नात्याने भारत सरकारशी केलेल्या सहकार्यातून विनायकरावांचे ‘ऑपरेशन पोलो’च्या यशात मोठे योगदान आहे. 

स्वातंत्र्योत्तर काळात हैद्राबाद राज्य मंत्रिमंडळात राहूनही विनायकरावांनी देशासाठी मोठी कामगिरी बजावली. १९५० ते ५२ या काळात वेलोदी सरकारमध्ये ते अन्न आणि अन्न  पुरवठा मंत्री होते तर १९५२ ते १९५६ या काळात बी रामकृष्ण राव यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थ, वाणिज्य आणि उद्योग मंत्री होते. १९५७ ते १९६२ या काळात विनायकराव भारताच्या दुसऱ्या लोकसभेवर नवनिर्मित आंध्रप्रदेश मधून निवडून गेले. 

वर नमूद केल्याप्रमाणे हैद्राबाद राज्याच्या त्रिभाजनात हैद्राबादमधील मराठी नेत्यांचा इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. विनायकराव हे त्याच काळातील एक थोर व्यक्तिमत्त्व. ३ फेब्रुवारी १९५६ रोजी विनायकरावांच्या एकसष्ठीला “विनायक अभिनंदन ग्रंथ’ प्रकाशित झाला. त्यात विनायकरावांच्या गुरुकुलातील स्नेह्यांनी तसेच स्वातंत्र्य काळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी आठवणीपर लेख लिहिले आहेत. यातून विनायकरावांच्या जीवनावर बराच प्रकाश पडतो. त्यानंतर १९८४ साली श्रीमती नंदिनी कपूर यांनी ‘इंटरनॅशनल तेलगू इन्स्टिट्यूट’ या संस्थेअंतर्गत विनायकराव यांचे चरित्र इंग्रजीतून प्रकाशित केले. १९९५ साली ‘मराठवाड्याचे मानकरी’ या सदरात श्री. कृष्ण उजळंबकर यांनी कालिंदी प्रकाशन या संस्थेअंतर्गत मराठीतून विनायकराव यांचे चरित्र प्रकाशित केले. 

नवीन पिढीला विनायकरावांची पुन्हा ओळख व्हावी या हेतूने हे ऐतिहासिक पुस्तक प्रसिद्ध करीत आहे. पुस्तक लिहिताना काळाप्रमाणे घटनाक्रम मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि घटना सोप्या आणि सरळ शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ऐतिहासिक घटना विनायकराव केंद्रबिंदू मानून गुंफलेल्या आहेत. विनायकरावांच्या कार्यकाळात हैद्राबाद संस्थानामध्ये अनेक घडामोडी होत होत्या त्या सर्वांचा या पुस्तकात उल्लेख करणे शक्य नसल्याने काही घटनांचा उल्लेख या पुस्तकात झालेला नाही. याबद्दल मी प्रथमच दिलगिरी व्यक्त करतो. 

पुस्तक लिहिण्यासाठी लागणारे संदर्भ गोळा करताना अनेकांचे सहकार्य लाभले. पुस्तक लिहिण्यात आणि प्रकाशित करण्यात माझे कुटुंबीय, सहकारी, मित्र, प्रकाशक यांनी दिलेल्या प्रोत्साहन आणि मदतीशिवाय पुस्तकाचे प्रकाशन शक्य नव्हते. या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे.